गडचिरोली : पावसाळी अधिवेशनादरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ आणि सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत महाविद्यालयासाठी निधी आणि जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. शासनाने या कामासाठी ₹ ४७१.४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच या महाविद्यालयाच्या बांधकामाची सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी दिली.
सध्या प्रस्तावित जागेवरील कृषी महाविद्यालय, शासकीय रुग्णालय आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्तित्व कायम ठेवून जागेची निश्चिती करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आमदार नरोटे यांना संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज ता. 31 ऑगस्टला प्रस्तावित जागेची पाहणी केली. पुढील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक गडचिरोलीत येणार आहेत.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय या दोन्ही संस्थांचे अस्तित्व कायम राहील याची काळजी घेतली जात आहे. कृषी महाविद्यालयाला भविष्यात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल याचीही खात्री केली जात आहे. या कामासाठी आवश्यक असलेली वन विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.
गडचिरोलीच्या आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात ही एक मोठी क्रांती ठरेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे.
0 Comments