डाव्या मित्रपक्षांचे १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन
गडचिरोली : संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने या योजनेतील अपंग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य सुरू केले आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना ही वाढ लागू करण्यात आली नसल्याने सध्याच्या महागाईच्या काळात विधवा परित्यक्ता व वयोवृध्द निराधारांनी अल्प अर्थसहाय्यात आपली दिवाळी कशी साजरी करावी व महिनाभराची गुजराण कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सरसकटपणे किमान अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी डाव्या मित्रपक्षांनी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन व धरणे प्रदर्शनाची हाक दिली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर यांच्या नेतृत्वात गडचिरोली तहसील कार्यालयासमोर निराधार योजनेचे लाभार्थी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठिय्या मांडून आंदोलन करणार आहेत. धानाला शासनाने साडेतीन हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीचाही यात समावेश असणार आहे. आरमोरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्या तर समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथील तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, आकाश आत्राम यांच्या नेतृत्वात एट्टापल्ली कार्यालयासमोर तर भाई रमेश चौखुंडे, प्रभाकर गव्हारे, संजय दुधबळे, हेमंत खेडेकर यांच्या नेतृत्वात चामोर्शीत तसेच भाई चिरंजीव पेंदाम, राकेश मरापे यांच्या नेतृत्वात निराधार योजनेचे लाभार्थी ठिय्या आंदोलन छेडणार आहेत.
या एक दिवसीय ठिय्या आंदोलन व निदर्शनात विधवा - परित्यक्ता महिला, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने आप आपल्या तहसील कार्यालयांसमोर एकत्र येऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व समाजवादी पक्षातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments