विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला बरखास्त करा : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी

गडचिरोली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विद्यार्थी आणि सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी अपयशी ठरले असून मोदी सरकारला तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रपतींकडे केली आहे. 

शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वच क्षेत्रात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. सरकारातील सर्व मंत्री केवळ अदानी - अंबानी यांच्यासाठी काम करत असून देशातील सामान्य जनतेच्या हक्क - अधिकारांची भीडमुर्वत न ठेवता मनमानी कारभार करत आहेत. 

या मनमानी कारभाराचा परिणाम म्हणून देशभरात महत्वाच्या परिक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार जबाबदारी स्विकारायला तयार नाही. याविरोधात युवकांची चळवळ असलेल्या काॅक्रोच जनता पार्टी आणि इतर युवक संघटनांनी दिल्लीत जंतर मंतर येथे मागील २७ दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद असून हुकुमशाही मोदी सरकारने कोणतीही चर्चा न करताच शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी सुरू केलेले आमरण उपोषण बळजबरीने संपविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञ सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके व इतर लाखो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमच्या पक्षाचा भक्कम जाहीर केलेला आहे. देशातील लोकशाही आणि संविधान नाकारत असल्याची ही कृती मोदी सरकारने केली असून आम्ही या कृतीचा पुरजोर विरोध आणि निषेध करत आहोत. तसेच नाकाम सत्ताधाऱ्यांना पदावर आणि सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार किंवा नैतिकता राहिलेली नाही. त्यामुळे  आपण देशभरातील विद्यार्थी - तरुण आणि सामान्य जनतेचा मोदी सरकारविरोधातील रोष लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तातडीने बरखास्त करून देशातील जनतेला न्याय द्यावा. असे झाले नाही तर देशातील सामान्य जनता तुम्हाला माफ करणार नाही असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, डंबाजी भोयर, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता मेश्राम, संगिता चांदेकर, पोर्णिमा कांबळे, सोनाली कवडो प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments