गडचिरोली : गडचिरोलीत शेतकऱ्यांच्या जमिनींवरून मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. विमानतळ आणि एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध 'किसान काँग्रेस'ने रणशिंग फुंकले आहे.
सोमवारी आयोजित एका धडाकेबाज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दीपक वाढई आणि दृष्टांत किरसान यांनी थेट शासनाला इशारा देत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन (प्रेस नोट) प्रसिद्ध केले.
काय आहेत किसान काँग्रेसच्या प्रमुख मागण्या?
सक्तीचे भूसंपादन थांबवा: विमानतळासाठी मुडझा व गुरवळा, तसेच एमआयडीसीसाठी चामोर्शी तालुक्यातील ७२ गावांतील सुपीक जमिनींचे अधिग्रहण तत्काळ थांबवावे.
धानाला दमदार भाव: महागाई वाढलीये, त्यामुळे धानाला ४,००० रुपये हमीभाव आणि हेक्टरी ५०,००० रुपये रोख बोनस मिळालाच पाहिजे. ७ दिवसांत पैसे द्या: शेतकऱ्यांनी धान विकल्यानंतर त्यांचे पैसे (चुकारे) ७ दिवसांच्या आत थेट बँक खात्यात जमा करा.२४ तास वीज: शेती पंपांना दिवसा आणि रात्री मिळून अखंडित २४ तास वीजपुरवठा द्या.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त: रानटी हत्ती आणि वाघांचा तातडीने बंदोबस्त करा. पिकांच्या नुकसानीला एकरी ५० हजार आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत द्या.
शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षड्यंत्र खपवून घेतले जाणार नाही. शासनाने मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा किसान काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला आहे.


0 Comments