गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; जिल्हा प्रशासनाची तत्काळ मदत




गडचिरोली : मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी  बस अडकून पडल्या होत्या. पाण्यातून जाताना दोन्ही बसांचे इंजिन पाण्यामुळे बंद पडल्याने वाहने जागेवर थांबली होती. जिल्हा प्रशासनाने तात्काळ जेसीबी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने दोन्ही बस बाहेर काढल्या असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.


गडचिरोली–आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एक खाजगी बस  खोलवर अडकली होती. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ जेसीबी व हायवा घटनास्थळी पाठवून बचावकार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या मदतीने ही बस बाहेर काढण्यात आली.


त्याचप्रमाणे, गडचिरोली–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीजवळ पुलाच्या अलीकडे एस.टी. महामंडळाची एक बस देखील इंजिन मध्ये पाणी गेल्याने बंद पडून अडकली होती. या बसमध्ये २३ प्रवासी होते. येथेही प्रशासनाने त्वरित जेसीबी पाठवून बसला बाहेर काढले. 

या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नसून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बस सुरक्षित बाहेर काढल्या. प्रवाशांना जिल्हा प्रशासनातर्फे तात्पुरत्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे.

आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी तसेच पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या उपस्थितीत दोन्ही बसचे बचाव कार्य पार पाडण्यात आले.

 जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पाण्याचा प्रवाह असलेल्या सर्व रस्त्यांवर कोणतीही वाहनं पाण्यातून जाऊ नयेत यासाठी पोलिस प्रशासनाला तातडीने बॅरिकेटिंग लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळी हवामानात नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments