गडचिरोली : जिल्ह्यातील अवैध कारवायांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अंमली पदार्थ (गांजा) उत्पादन करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत आरोपीच्या शेतातून तब्बल 27 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन धानोरा यांच्या संयुक्त पथकाने केली.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 4 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, मौजा परसवाडी येथील मोरेश्वर हिरामण उसेंडी (वय 58) यांनी स्वतःच्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड केली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ परसवाडी येथे धाड टाकली. पंचासमक्ष आरोपीच्या शेताची झडती घेतली असता, शेतामध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान एकूण 54.5 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार प्रति किलो 50 हजार रुपये प्रमाणे या मुद्देमालाची किंमत 27 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.
आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन धानोरा येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 5 मे रोजी नोंदवलेल्या या गुन्ह्यात आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांचे नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा सुधीर दंडीकेवार, पोन धनंजय चौधरी, पोअं प्रशांत गरफडे, पोअं रोहित गोंगले, चालक पोअं संदीप भेंडारे तसेच पोस्टे धानोराचे सपोनि. प्रशांत जंगले व अंमलदार यांनी पार पाडली.


0 Comments