धानोरा-मोहली मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; पती-पत्नीसह तिघे गंभीर जखमी


पाच महिन्यांची गर्भवती महिला जखमी; प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले
धानोरा :  तालुक्यातील धानोरा-रंगी मार्गावर मोहली गावाजवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघे जण जखमी झाल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी घडली. जखमींमध्ये पती-पत्नीसह पाच महिन्यांची गर्भवती महिला असल्याने या घटनेने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
या अपघातात कविदास दादाजी लेनगुरे (वय ४०, रा. मोहली), दर्शना सुधाकर पोटावी (वय ३०, रा. जांभळी) आणि सुधाकर सनकु पोटावी (वय ४०, रा. जांभळी) हे तिघे जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कविदास लेनगुरे हे मोहली येथून दुचाकीने धानोऱ्याकडे येत होते. तर सुधाकर पोटावी हे पत्नी दर्शना यांच्यासह दुसऱ्या दुचाकीने धानोऱ्याकडून मोहलीकडे जात होते. दरम्यान, मोहली गावाजवळील वळणावर दोन्ही दुचाकींची धडक झाली. या अपघातात तिघांच्याही चेहरा, छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी तिघांनाही तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी तिघांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment

0 Comments