गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने सोमवार, १३ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता गडचिरोली येथील अभिनव लॉन, चंद्रपूर रोड येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर राहणार आहेत.
मेळाव्यात शेतकरी, शेतमजूर, महिला, भूमिहीन शेतकरी, बेरोजगार युवक-युवती यांच्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती, संघटन बांधणी तसेच पक्ष विस्ताराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments