मृतकांच्या कुटूबियांना आर्थिक मदत व जखमीला पूर्ण उपचार खर्च देणार
चंद्रपूर : चिंचाळा येथे रविवारी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान DNR च्या ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाला होता. मृतकांच्या कुटूबियांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे DNR च्या व्यवस्थापनाने मृतकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत व जखमीला उपचाराचा पूर्ण खर्च देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल ९ तास ठप्प असलेली चंद्रपूर - घुग्घुस वाहतूक सुरू झाली.
सिदुर येथील संकेत झाडे (२५ वर्ष), अंकित मत्ते व अजय माथुलकर हे एमआयडीसी येथे कामाला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव DNR च्या ट्रकने चिरडले. दुचाकीमधील संकेत झाडे याचा जागीच मृत्यू झाला तर अंकित मत्ते हा रुग्णालयात नेतानीच मरण पावला, तर अजय माथुलकर याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.
संकेत झाडे याचा मृतदेह तिथेच ठेवण्यात आला होता. जोपर्यंत मृतकांना आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू राहील व मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे व समस्त ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर DNR व्यवस्थापनाने जिल्हा संघटीका सौ. उज्वला नलगे यांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
0 Comments