जिल्हयातील विविध कामांचा घेतला आढावा
गडचिरोली : देशातील ११२ आकांक्षित जिल्हयांमधे गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे. या जिल्हयात प्रशासन नाविण्यपूर्ण योजना राबवून गरजूंसाठी विकासात्मक कामे पार पाडत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडचिरोली येथे केले. ते वेगवेगळया राज्यांमधे आकांक्षित जिल्हयांच्या दौऱ्यावर आहेत. त्याची सुरूवात त्यांनी गडचिरोली येथून केली. आदिवसी, नक्षल पिडीत जिल्हयात अनेक विकासकामे करीत असताना व्यत्यय निर्माण होतो. या आव्हानांना सामोरे जात आरोग्य, शिक्षण यात प्रामुख्याने दिशा, फुलोरा तसेच ग्रामसभा सक्षमीकरणाचा प्रकल्प राबवून दुर्गम भागात सुविधा पुरविण्याचे कार्य केले जात आहे. केंद्र शासनाच्या वेगवेगळया योजनांची अंमलबजावणी शेवटच्या लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे करावी असे आवाहनही त्यांनी बैठकीत उपस्थितांना केले. त्यांनी आजच्या भेटीत जिल्हा प्रशासनाचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम या विषयावर आढावा घेतला तसेच केंद्रीय अर्थसहायित व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिली. तसेच पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते.
आढावा बैठकीत त्यांनी उद्योग वाढीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्हयात युवकांनी उद्योगाकडे वळण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी एमएसएमई मधून दहा ते पंधरा कोटी पर्यंत मदत घेता येते. यासाठी युवकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले. कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण, शेतीला चालना तसेच दुग्ध व्यवसायाला चालना देवून लोकांना अर्थिक स्थिती सुधरण्यासाठी योजनांची यशस्वी अंमलबजावणी करावी याबाबत त्यांनी बैठकीत सूचना केल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या जिल्हयातील योगदानाबद्दल प्रशंसा केली व विकास होत असताना अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे असते असे प्रतिपादन केले.
पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी जिल्हयातील राष्ट्रीस महामार्ग बाबत असलेली समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले, केंद्र शासनाच्या जनधन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वल भारत योजना, घरकूल योजना, आयुष्यमान भारत योजना अशा वेगवेगळया योजनांतून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकास होत आहे. गडचिरोली जिल्हयात केंद्राच्या योजनांची चांगली अंमलबजावणी होत आहे. सामाजिक न्याय विभागातील उपआयुक्त पद तातडीने भरण्यासाठीही राज्यास कळविणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
व्यसन मुक्ती केंद्रातील व्यक्तींशी साधला संवाद
केंद्रीय निधीच्या अर्थ सहाय्यातून महिला महाविद्यालयालगत असलेल्या वेदांती व्यसनमुक्ती केंद्रास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कामाकाजाबाबत माहिती घेतली व भरती असलेल्या व्यक्तींबरोबर चर्चाही केली. यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडलेल्या युवकांना भेटूनही त्यांनी विचारपूस केली. यावेळी केंद्राचे संचालक मिलिंद डोंगरे यांनी माहिती दिली.
0 Comments