गडचिरोलीतील 24 विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणाची संधी

लॉयड्स मेटल्सकडून कर्टिन विद्यापीठात पूर्णतः प्रायोजित जागतिक शिक्षण गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 24 गुणवंत विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील नामांकित कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पूर्णतः प्रायोजित करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सुरजागड लोहखनिज खाणींचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर, LMEL ने औद्योगिक प्रगतीचा लाभ थेट स्थानिक युवकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरण यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, तो गडचिरोलीतील युवकांसाठी जागतिक शिक्षणाच्या दालनांचे दरवाजे उघडणारा ठरत आहे. हा उपक्रम 4 मार्च 2024 रोजी ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’च्या समारोप समारंभात श्री. प्रभाकरण यांनी केलेल्या वचनपूर्तीचा प्रत्यय देणारा आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, दीर्घकाळ उग्रवादाने प्रभावित राहिलेल्या गडचिरोलीसाठी शाश्वत आणि सकारात्मक भविष्य घडवणे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सध्या बॅच 1 आणि बॅच 2 मधील 10 विद्यार्थी पर्थ येथे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विषयांत शिक्षण घेत असून, आणखी 14 विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर झाला आहे. हे विद्यार्थी लवकरच आपले अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर यशस्वी पदवीधरांना LMEL मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पदांवर नोकरीची संधी देण्यात येणार असून, पुढील टप्प्यात कर्मचारी शेअर मालकी योजना (ESOP) साठीही ते पात्र ठरणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत “लॉयड्स–कर्टिन पूर्णतः प्रायोजित शैक्षणिक कार्यक्रम” राबविण्यात येत असून, त्यामध्ये 100 टक्के शिक्षण शुल्क, निवास व्यवस्था, राहणीमान खर्च, प्रवास तसेच प्रशासकीय खर्चाचा समावेश आहे. कंपनी दरवर्षी प्रति विद्यार्थ्यांमागे सुमारे 50 लाख रुपये खर्च करत असून, एकूण गुंतवणूक प्रति विद्यार्थी 1.5 कोटी ते 2 कोटी रुपयांपर्यंत आहे. या प्रसंगी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि श्री. बी. प्रभाकरण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. आपल्या भाषणात श्री. गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यात गडचिरोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे उभारली जातील, असा विश्वास व्यक्त केला. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना उद्याचे नेतृत्व घडवण्यासाठी सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे. या माध्यमातून LMEL ने केवळ नैसर्गिक संसाधनांमध्येच नव्हे, तर गडचिरोलीतील माणसांमध्ये गुंतवणूक करण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. #LMEL#

Post a Comment

0 Comments