आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून परिवर्तन घडवा : किशोर टोंगे lokpravah.com




आनंदवन : आपण ग्रामीण भागातून येतो म्हणून आपली बुद्धिमत्ता कमी असते, अशातला भाग नाही. आपल्याकडे बुद्धिमत्ता अफाट आहे. त्या बुद्धिमत्तेचा वापर आपल्या परिसरामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी स्वतः केला पाहिजे. शासनाच्या भरोशावर अवलंबून न राहता एकाने नसेल होत तर समूहाने शेतीपूरक व्यवसाय सुरू करावे, असे प्रतिपादन युवा उद्योजक किशोर टोंगे यांनी केले.
येथील आनंद निकेतन महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाद्वारे "ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय" यावर संविधान दिनी व्याख्यान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मृणाल काळे तर विशेष अतिथी म्हणून निकेश आमने-पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. तनुजा वैद्य यांची मंचावर उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले.
श्री. टोंगे पुढे म्हणाले, ग्रामीण भागाचा शेती हा कणा आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतीला उद्योग म्हणून केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. युवा पिढीने शेती सोबतच व्यवसाय विषयक शिक्षण घेऊन लघु उद्योग उभारावे. सोशल मीडियावर निरर्थक वेळ न घालवता यु-ट्युबवरून व्यवसायासंबंधी माहिती घेत राहावी, त्यातून आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने कसा मोठा करता येईल याचाही अभ्यास करावा. कारण आजच्या घडीला व्यवसायातूनच आर्थिक समृध्दी साधता येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे आपल्या जीवनात संघर्ष करून यश गाठले. त्यांचा आदर्श घेऊन स्वत: संघर्ष करा, यश नक्की मिळेल, असेही ते म्हणाले.
निकेश आमने-पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन पल्लवी जीवतोडे हिने तर आभार प्रतीक्षा दडमल हिने मानले. राष्ट्रगीताने व्याख्यानाची सांगता झाली. व्याख्यानाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments