Gondi language गोंडी भाषेतून लेखन करून संस्कृती संवर्धनासाठी विविध विषयांवर साहित्य निर्मिती व्हावी ; डॉ. दिलीप चव्हाण


गोंडवाना विद्यापीठात 'लुप्त होत असलेल्या बोली' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन

राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करताना उजवीकडून प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ. अनिल चिताडे

गडचिरोली : गोंडी बोली भाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील बोलली जाते. चंद्रपूर ,गडचिरोली या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशच्या सीमेलगतही गोंडी बोली भाषा बोलली जाते. आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते .गोंडी ही एकमेव प्राचीन बोलीभाषा आहे . या भाषेचे संवर्धन, तिचे जतन तसेच त्या भाषेतून लेखन करून संस्कृती संवर्धनासाठी विविध विषयांवर साहित्य निर्मिती व्हावी असे प्रतिपादन 'भाषा संवर्धन व जतन 'या विषयावर बोलतांना भाषा साहित्य व संस्कृती अभ्यास विभाग स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे प्रा. डॉ.दिलीप चव्हाण यांनी केले. गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत
'लुप्त होत असलेल्या बोली' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन इंग्रजी विभाग व आदिवासी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले त्याप्रसंगी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

या राष्ट्रीय परीसंवादाचे उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन , प्रमुख अतिथी म्हणून संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. अनिल चिताडे , या परिसंवादाचे समन्वयक वैभव मसराम आदी उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनपर भाषणात गोंडवाना विद्यापीठाचे कुल सचिव डॉ.अनिल हिरेखन म्हणाले, भाषा हे संवादाचे माध्यम आहे .जगाच्या पातळीवर रोजगाराच्या बाबतीत भाषेला जोडल्या जाते. गोंडी, माडिया, या भाषेचे संवर्धन आणि प्रचार तसेच प्रसार करणे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना होतो आहे का ,याचे संशोधन होणे गरजेचे आहे .आपल्या संशोधनामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला पाहिजे असे ते म्हणाले.

संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. अनिल चिताडे म्हणाले, आदिवासींचा भाग हा मागास आहे असं समजलं जातं पण खऱ्या अर्थाने संस्कृती आणि स्वच्छतेच्या बाबतीत आजही आदिवासी पुढे आहेत .भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या बाबतीतही आदिवासींचे योगदान हे मोठे आहे. या समुदायाच्या बोलीभाषेवर रिसर्च होणे महत्त्वाचे आहे त्यामुळे अशा परिसंवादाची गरज असल्याचे ते म्हणाले .
या परिषदेत वेगवेगळ्या भाषेतील संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या राष्ट्रीय परिसंवादात संशोधक विद्यार्थ्यांनी आपले शोध पत्रे सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी संशोधन केंद्राचे तसेच या परिसंवादाचे समन्वयक डॉ. वैभव मसराम, संचालन प्रा. डॉ. शिल्पा आठवले तर आभार प्रा.डॉ.प्रमोद जावरे यांनी मानले.

राष्ट्रीय परिसंवादाचा उद्देश

गोंडी, माडिया या भाषा इथल्या लोकांसाठी सामान्य आहेत. या भाषांना त्यांची लिपी आहे. तर बहुतांश विद्यार्थी गोंडी आहेत. माडिया आणि छत्तीसगढ़ी भाषिक, या भाषांचे दस्तऐवजीकरण आणि जतन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवाने, जगाला याबद्दल माहिती नाही, त्यामुळे या भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आणि लुप्त होत चाललेल्या भाषांना हातभार लावण्यासाठी विद्यापीठाने विधायक आणि सकारात्मक विचार प्रक्रिया सुरू केली आहे.प्राचीन भाषांच्या जतनाबद्दल जागरूकता विकसित करणे आणि चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे आहे. हा या परिसंवादाचा उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments