अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगलात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनीदेखील गोळीबार करून नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. यावेळी चकमकस्थळी १ पिस्तोल,१ भरमार बंदूक,१ वॉकीटॉकी, चार्जर व अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. सध्या नक्षल्यांचा भूमकाल सप्ताह सुरू आहे. यादरम्यान ते मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा डाव उधळून लावण्यात आल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक अभियान अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या देखरेखीत पार पडली. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. घटनापरिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.
0 Comments