चांगले चरित्र निर्माण करण्यासाठी अडचणी तर येणारच – जिल्हा माहिती अधिकारी, सचिन अडसूळ Sachin Adsul

नेहरू युवा केंद्रामार्फत आयोजित युवा दिन कार्यक्रमात प्रतिपादन


गडचिरोली : युवकांनी ऐन उमेदीच्या काळात आपल्या करिअरला गती देण्यासाठी प्रयत्न करावा. एक चांगले चरित्र निर्माण करण्यासाठी हजारो ठेचा खाव्याच लागतील. त्यानंतर निश्चित चांगले चरित्र, चांगले करिअर निर्माण होईल असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. नेहरू युवा केंद्र गडचिरोली मार्फत आयोजित राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन शासकिय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे केले होते. यावेळी उपस्थित युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी दिलेले विचार हे प्रेरणादायी आहेत. त्यांचा अंगिकार केल्यास उर्जा मिळते. विवेकानंदांची आभ्यासू व तत्त्वज्ञानी वृत्ती आपण जोपासली पाहिजे. भारत देश युवकांचा देश आहे. देशाची वाटचाल युवक ठरवित असतात. विवेकानंद यांनी सांगितल्या प्रमाणे तरूणाईला जी शिकवण मिळते तीच शिकवण राष्ट्रकार्याच्या मदतीला येत असते. तेव्हा शुद्धता, संयम आणि चिकाटी अंगिकारून इतरांवर प्रेम करायला शिका हे विचार त्यांनी यावेळी मांडले. या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक देताना, अमित पुंडे यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, युवा दिन संपुर्ण देशात आयोजित केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात देशातील युवकांना उद्देशून विचार मांडत असतात. स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी आपल्या कार्यकाळात विविध विचार, तत्वज्ञान मांडले. या विचारांची एक दिशादर्शक म्हणून आपण स्विकार केला पाहिजे. युवा दिन हा विवेकानंद यांचे जीवन आणि शिकवण जाणून घेण्यासाठीच आयोजित केला जातो असे ते यावेळी म्हणाले. निलेश तेलतुंबडे यांनी आपल्या मार्गदर्शनात इतरांना मदत करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन युवकांना केले. कार्यक्रमाचा शुभारंभ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून झाला.

पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण* : यावेळी युवा दिन कार्यक्रमानंतर देश स्तरावरील कर्नाटक मधील हुबळी येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. या मुख्य कार्यक्रमांमध्ये प्रसारित विविध मान्यवरांचे विचार यावेळी उपस्थित युवकांना ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. या कार्यक्रमाला गडचिरोली मधून पाच विद्यार्थी हुबळी कर्नाटक येथे गेले आहेत.

Post a Comment

0 Comments