कंत्राटी डॉक्टर-कर्मचा-यांचा आझाद मैदानावर लढा

- जिल्हाभरातील हजारो कर्मचारी सहभागी


- सहाव्या दिवशीही आरोग्य सेवा विस्कळीत

गडचिरोली : आरोग्य सेवेत सामावून घेण्यात यावे या मुख्य मागणीला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत राज्यभरातील कंत्राटी डॉक्टर- कर्मचा-यांनी आज, 30 ऑक्टोबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी आक्रोश आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनामुळे मागील सहा दिवसांपासून आरोग्य सेवेवर याचे विपरीत परिणाम होत असून यामुळे जिल्हाभरातील आरोग्य सेवा विस्कळीत पडली आहे.



राष्ट्रीय आरोग्य अभियान मागील 17 वर्षापासून राज्यात सुरु असून तेव्हापासून कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी नेमून त्यांचेकडून आरोग्य सेवा करण्यात येत आहे. शासन सेवेत 31 मार्च 2023 पूर्वी सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला दिले असून सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटूनही शासन स्तरावरुन कोणत्याही हालचाली झाल्या नाही. तर आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने ते याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत राज्यभरातील कंत्राटी डॉक्टर-कर्मचा-यांनी 25 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र शासनाद्वारे ठोस निर्णय घेण्यात न आल्याने मुंबई येथे आजपासून दोन दिवसीय राज्यभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. 

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचा-यांनी मुंबई गाठित आझाद मैदानात लढा अधिक तीव्र केला आहे. जोपर्यंत शासन स्तरावरुन ठोस निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत सदर लढा कायम ठेवण्याचा निर्धार राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी व कर्मचारी समायोजन कृती समितीन घेतला आहे. यामुळे सदर आंदोलन अधिकच चिघळण्याची लक्षणे आहेत. कंत्राटी कर्मचा-यांच्या या आंदोलनामुळे आरोग्य सेवा ठप्प पडली असतांना हे आंदोलन अधिक लांबल्यास रुग्णांची हेळसांडीसह कार्यरत मोजक्याच अधिकारी व कर्मचा-यांवर कामाचा ताण पडण्याची चिन्हे आहेत.

इन्फो......

जोपर्यंत शासन धोरणात्मक निर्णय घेवून अभियानांतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे सेवेत समायोजन करणार नाही, तोपर्यंत कृती समितीचे आंदोलन बंद करणार नाही. लवकरात लवकर समायोजनाबाबत शासन स्तरावरुन ठोस पाऊल न उचलल्यास आंदोलनातील कर्मचारी आत्मदहन करण्यावर ठाम आहेत.
निलेश सुभेदार
मुख्य समन्वयक, समायोजन कृती समिती, 

.........................
इन्फो......

आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झालेली असतांनाही अधिकारी वर्ग आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे सांगत आहेत. परंतू वस्तुस्थिती ही वेगळीच असून त्याचा प्रत्यय रुग्णालयात गेल्यावरच दिसून येतो. त्यामुळे शासनाने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात. 
गिरीश लेनगुरे, 
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 
...............
इन्फो......

जिल्ह्यातील रुग्णांना वेठीस धरण्याचा कृती समितीचा कोणताही हेतु नाही, परंतू गेल्या 17 वर्षापासून शासन स्तरावरुन नेहमीच अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे शासन सेवेत समावेशनाबाबत चालढकल सुरु आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत धोरणात्मक निर्णय घेवून कृती समितीची मागणी मान्य करुन कर्मचारी यांना योग्य न्याय द्यावा. 
जितेंद्र कोटगले
मुख्य समन्वयक,

Post a Comment

0 Comments