गडचिरोली : विकासाच्या नावाने लोह खाणी खोदण्यासाठी जिल्ह्यात ग्रामसभा आणि स्थानिक नागरिकांवर बळाचा वापर करुन वारंवार दडपशाही करुन ग्रामसभांचे ठराव, निवेदन, मोर्चे, आंदोलनांची दखल न घेता मुस्कटदाबी केली जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी पेसा कायद्याने ग्रामसभांना स्वयंशासनाचे अधिकार दिलेले असल्याने जिल्ह्यातील खाणींविरोधातील आंदोलन, मोर्चे पोलीस कारवाई करुन दडपून टाकणे बंद करण्यात यावे, अशी मागणी प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
मागिल २५० दिवसांपासून तोडगट्टा येथे सुरु असलेले खदान विरोधी आंदोलन नुकताच जिल्हा प्रशासनाने बळाचा वापर करुन उधळून लावला आहे. यापूर्वीही एट्टापल्ली येथे सुरु असलेले आंदोलन बळाचा वापर करुन उधळून लावले होते. इतर पक्ष, संघटनांचे मोर्चे, आंदोलन, कार्यकम जिल्ह्यात व्यवस्थीत पार पडत असतांना केवळ लोह खाणींच्या विरोधात होणारे मोर्चे, आंदोलन, कार्यकमांनाच जिल्हा प्रशासन नेहमी टार्गेट करुन, व्देषभावनेने पोलीस बळाच्या जोरावर दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. ही निषेधार्ह बाब असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
शांततेच्या मार्गाने संविधानिक हक्कांसाठी आंदोलन, मोर्चे करण्याचा अधिकार आदिवासी जनता, ग्रामसभा आणि त्यांची बाजू घेणारे नेते, कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटनांना नाही काय? असा प्रश्न करुन, गडचिरोली जिल्हा मुख्यालयी खदानविरोधी बेमुदत धरणे आंदोलन करण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी. ग्रामसभा आणि पारंपारिक इलाखे, राजकीय पक्ष, संघटना यांनी वेळोवेळी ठराव, निवेदन, आंदोलन, मोर्चे केल्याबद्दल व्देषभावनेने लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत. लोह खाणी रद्द करुन एफसेझ म्हणजेच फाॅरेस्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्यात येवून जंगलांवर आधारित उद्योगांच्या माध्यमातून रोजगार देण्यात यावा. लोह खाणींना विरोध करणाऱ्यांना नक्षलसमर्थक भावनेने पोलीस कारवाई करणे बंद करण्यात यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. डॉ.महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, आदिवासी विकास युवा परिषदेचे कुणाल कोवे, विनोद मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा, जयश्री वेळदा, बाजीराव उसेंडी, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपूरे, राजन बोरकर, कोत्तुराम पोटावी, सावजी उसेंडी, दशरत पोटावी, प्रल्हाद रायपूरे, सचिन मोतकुरवार, सुरज जक्कुलवार, मंगेश होळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments