गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आरोग्य, क्रीडा, शिक्षण व रोजगाराला प्राधान्य देणार - डॉ. मिलिंद नरोटे



आष्टी येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा
 
 गडचिरोली : महायुती व भारतीय जनता पार्टीने जनसामान्य नागरिकांच्या विकासाकरिता मागील १० वर्षांपासून अनेक आर्थिक विकास करणाऱ्या योजना राबविल्या. या योजनांच्या आधारे गडचिरोली जिल्ह्यातील तसेच विधानसभेतील अनेक गोरगरिबांचा विकास झालेला आहे. महायुती व भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवून मला गडचिरोली विधानसभेसाठी उमेदवारी दिली. भाजपाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आरोग्य, क्रीडा, शिक्षण व रोजगाराला प्राधान्य देऊन महिला, विद्यार्थी, बेरोजगार, शेतकरी आदी सर्वसामान्य नागरिकांची प्रगती करणार, असे प्रतिपादन भाजपाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.

 गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे व अहेरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचारासाठी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जाहीर सभेला प्रचारक व मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी उपस्थित होते. यावेळी मंचावर ना. धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपच्या महिला अध्यक्ष गीताताई हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले कि, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दीड हजार कोटींची कामे करण्यात आली आहेत. आष्टी ते सिरोंचा या १४० किमी मार्गासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. वनविभागाच्या जाचक अटींमुळे अनेक राष्ट्रीय महामार्गाची कामे अडकलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्या क्षेत्रामध्ये शेती व उद्योगाचा विकास होतो तिथे नक्कीच प्रगती साधली जाते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे तडफदार उमेदवार डॉ . मिलिंद नरोटे याना प्रचंड बहुमताने विजयी करा व आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला निवडून आणून आपला विकास करा, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

या जाहीर सभेला भाजपचे विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, रवींद्र ओल्लालवार, बबलू हकीम, रमेश भुरसे, आशिष पिपरे आदी भाजपचे पदाधिकारी/कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments