महाराष्ट्रासह विविध राज्यांतील आदिवासी कलाकार, स्पर्धक, समाजबांधव होणार सहभागी
गडचिरोली : गडचिरोली शहरात पहिल्यांदाच गडचिरोली ट्रायबल महोत्सव तसेच राष्ट्रीय पातळीवरील ट्रायबल कल्चरल स्पर्धा 'कोया किंग अँड क्वीन' चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने शनिवार (ता. २४) आयोजित पत्रकार परीषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेत पदाधिकारी म्हणाले की, सांस्कृतिक महोत्सव २८ व २९ जानेवारी २०२६ ला स्थानिक धानोरा मार्गावरील महाराजा लॉन येथे पार पडणार आहे. हिरा-सुका बहुउद्देशीय आदिवासी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही संघटनांतर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून आलेले आदिवासी कलाकार, स्पर्धक आणि समाजबांधव सहभागी होणार असून, आदिवासी जीवनशैली, लोकनृत्य, पारंपरिक गीत, वेशभूषा, सांस्कृतिक साहित्य व रितीरिवाज यांचे भव्य दर्शन नागरिकांना अनुभवता येणार आहे. देशभरातील आदिवासी समाजातील सांस्कृतिक वैविध्याची ओळख निर्माण करणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. बुधवार (ता. २८) सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर एकल आदिवासी गीतगायन स्पर्धा, ग्रूमिंग स्पर्धा तसेच समूह आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. गुरुवार (ता. २९) देशभरातून आलेल्या स्पर्धकांचे आगमन होणार असून, मान्यवर प्रमुख व विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता स्पर्धांना सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता पारितोषिक वितरण समारंभ, तर रात्री १० वाजता महोत्सवाचा समारोप होणार आहे. देशभरातील समृद्ध आदिवासी संस्कृतीचे जतन, मिलन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने ही भव्य आदिवासी सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा व आंध्र प्रदेश येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन निःशुल्क आहे. स्पर्धकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. तसेच सहभागी स्पर्धकांच्या राहण्याची व जेवणाची संपूर्ण सोय आयोजकांकडून मोफत करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक स्पर्धकासोबत एका पालकाच्या राहण्याची व जेवणाची सुविधाही निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासी संस्कृतीशी संबंधित हस्तकला वस्तू, पारंपरिक साहित्य तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्थाही पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे. यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या कला-कौशल्यासोबत आर्थिक उत्पन्नाचीही संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा, लोककला, नृत्य, संगीत, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली देशभर पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. विशेषतः जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून, आदिवासी संस्कृतीचा उत्सव ठरणार आहे, देशातील विविध राज्यांतील आदिवासी समाज एकत्र येऊन आपली ओळख, परंपरा आणि अस्मिता अभिमानाने सादर करणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आदिवासी संस्कृतीचा जनसागर शहरात उसळणार आहे, या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवामुळे गडचिरोलीची ओळख देशपातळीवर अधिक ठळक होणार आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक पर्वात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परीषदेला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, कोषाध्यक्ष जाहिदा शेख, शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम, शहर उपाध्यक्ष भूषणा खेडेकर, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार आदी उपस्थित होते.


0 Comments