“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्‍ते प्रारंभ

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला कार्यक्रम स्‍थळाचा आढावा 



गडचिरोली : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १ कोटी वृक्ष लागवडीचा भव्य प्रारंभ राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज कार्यक्रम स्थळी भेट देत संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता वृक्ष लागवड पंधरवाड्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी “हरित महाराष्ट्र” मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात तब्बल ४० लाख झाडे लावण्यात येणार असून, हे अभियान जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांनी आज स्थलपरीक्षण केले. यावेळी कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या बैठकीच्या, मांडव व व्यासपीठाच्या व्यवस्थेची पाहणी करून कार्यक्रमाची सुसूत्रता आणि यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकूल, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) स्मिता बेलपत्रे, एनआयसीचे संजय त्रिपाठी तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान ड्रोन आणि उड्डाण उपकरणांवर बंदी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै 2025 रोजी गडचिरोली व मौजा कोनसरी येथे नियोजित दौरा पार पाडण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून, रिमोट कंट्रोल उड्डाण साधने इत्यादींचा वापर होऊ नये म्हणून गडचिरोली व मौजा-कोनसरी येथील कार्यक्रम स्थळाभोवतालचा ५ किमी परिसर तसेच संपूर्ण गडचिरोली शहर आणि जिल्हा ‘उड्डाणबंदी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात येत असल्यसाचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. 

या आदेशानुसार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते 23 जुलै 2025 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत वरील प्रकारच्या उड्डाण साधनांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे. "ड्रोन नियम 2021" अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आलेला असून, त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

Post a Comment

0 Comments