Markhanda त्रिपूर पूजनाने उजळले मार्कंडेश्वर मंदिर


दुस-या दिवशीही मार्कंड्यात भाविकांची मांदियाळी


त्रिपूर पूजन करताना म्हशाखेत्री परिवार

गडचिरोली : महाशिवरात्रीच्या दुस-या दिवशी आज अमावस्या असल्याने परंपरेनुसार मंदिराच्या शिखरावर व नदीच्या तिरावर तेलाचे दिवे सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड बुजूरुक येथील मारोती पाटील म्हशाखेत्री यांचे चिरंजीव प्रशांत पाटील म्हाशाखेत्री व राजू पाटील म्हाशाखेत्री यांच्या हस्ते लावण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर यात्रेला प्रारंभ झाला. मागील दोन वर्ष कोरोना निर्बंध असतानाही राज्यातील व राज्याबाहेरील भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. यावर्षी मात्र कोरोना निर्बंध हटल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. दरम्यान, आज दुस-या दिवशी परंपरेनुसार मंदिराच्या शिखरावर व नदीच्या तिरावर तेलाचे दिवे लावण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर बांधलेले हे प्राचीन मंदिर असून येथे वैनगंगा नदी उत्तर वहिनी होत असल्याने हे स्थळ भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेला भाविकांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. आज सायंकाळी 6 वाजता मंदिराच्या कळसावर व्याहाड बुजुरुक येथील मारोती पाटील म्हाशाखेत्री यांचे चिरंजिव प्रशांत पाटील म्हशाखेत्री व राजू पाटील म्हशाखेत्री, अरुण गायकवाड, पंकज पांडे, रामू महाराज गायकवाड यांच्या हस्ते दिवे लावण्यात आले. दिवे लावण्याचा मान गेल्या अनेक पिढ्यांपासून म्हशाखेत्री कुटुंबाला मिळत आहे, हे विशेष. दिव्यांचे महत्व असल्याने या दिवशी भाविक आवर्जून उपस्थित असतात. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, विश्वस्त माजी खासदार मारोतराव कोवासे, सहसचिव रामूजी तीवाडे, विश्वजित कोवासे, चंद्रकांत दोषी, साधना दोषी, उपेश हेबिज, नानाजी बुरांडे, दादाजी बारसागडे उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथील जगन्नाथ महाराज भजन मंडळाची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments