मेक इन गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाची सीबीआय, एसआयटी, इडी मार्फत चौकशी करा : नगरसेवक आशिष पिपरे


खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : पत्रकार परिषदेत आरोपांना प्रत्युत्तर  
 गडचिरोली : मेक इन गडचिरोली अंतर्गत चामोर्शी येथे राबविण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची CBI, ED किंवा SIT मार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी चमोर्शी नगरपंचायतीचे नगरसेवक आशिष  पिपरे यांनी  आज लँडमार्क हॉटेल  येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.

पुढे बोलताना पिपरे म्हणाले , सोशल मीडियाद्वारे माझ्या व माझ्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून राजकीय सूडभावनेतून बदनामी केली जात आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मेक इन गडचिरोली उपक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, बँक ऑफ इंडिया आरसेटी आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगयात्रा राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत काही महिलांनी अगरबत्ती उद्योगासाठी कर्ज प्रस्ताव सादर केले. सर्वांच्या संमतीने उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मशीन खरेदी प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना पिपरे म्हणाले की, सुरुवातीला मशीनची किंमत १ लाख १८ हजार रुपये दर्शविण्यात आली होती. मात्र ऑनलाइन पडताळणी केल्यानंतर सुमारे ९० हजार रुपयांत मशीन खरेदी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या तीन वर्षांत प्रत्येकी चार ते पाच टन उत्पादन झाले असून मशीन सध्या कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित महिलांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कोणताही भ्रष्टाचार झालेला नसल्याचे हमीपत्र दिल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, काही राजकीय विरोधकांकडून जाणूनबुजून महिलांना चुकीची माहिती देऊन प्रकल्पाविरोधात वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बँकेकडून कच्चा मालासाठी अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने व कोविड-१९ नंतर भांडवलअभावी प्रकल्प अडचणीत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काहींनी घरजप्तीची भीती दाखवून महिलांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा राजकीय डाव आखला जात असल्याचा आरोप करीत, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी. मी स्वतः पुढाकार घेऊन चौकशीची मागणी केली आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी, असे पिपरे यांनी सांगितले.

 माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने माझ्यावर खोटे आरोप लावणाऱ्या विरोधकांना कागदोपत्री उत्तर देणार असून जनतेचा व समाजाचा पाठिंबा माझ्यासोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Post a Comment

0 Comments