गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा यशस्वीरित्या


गडचिरोली, : गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित पोलीस शिपाई पदांसाठीची लेखी परीक्षा आज अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाली. एकूण 717 पदांसाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या 7003 उमेदवारांपैकी तब्बल 6971 उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली, म्हणजेच 99.54 टक्के उपस्थिती नोंदवली गेली.
परीक्षा गडचिरोली शहरातील 14 वेगवेगळ्या केंद्रांवर सकाळी 10.00 ते 11.30 वाजेपर्यंत सामान्य अध्ययन (पेपर 1) आणि दुपारी 13.00 ते 14.30 वाजेपर्यंत गोंडी व माडिया भाषा (पेपर 2) अशा दोन सत्रांत घेण्यात आली. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी एकूण 1000 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली होती, ज्यात 166 पोलीस अधिकारी, 693 पोलीस अंमलदार तसेच 132 शिक्षक आणि मंत्रालयीन कर्मचारी सामील होते.
पोलीस दलाने पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी अत्याधुनिक उपाययोजना केल्या. उमेदवारांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक नोंदणीचे पुनर्परीक्षण आणि सिग्नल जामरचा वापर करून कोणत्याही गैरप्रकारास प्रतिबंध घालण्यात आला. उमेदवारांना सोयीस्कर राहावे म्हणून गुगल मॅप लोकेशन आणि सोशल मीडियाद्वारे केंद्रांची माहिती व बैठक व्यवस्था प्रसारित करण्यात आली होती. पेपर 1 आणि पेपर 2 मधील ब्रेक दरम्यान उमेदवारांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली.

उत्तरतालिका आजच प्रकाशित
दोन्ही पेपरची उत्तर पत्रिका आज दुपारी 3.15 वाजता गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (gadchirolipolice.gov.in) प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना उत्तरतालिकेबाबत काही आक्षेप असल्यास पुढील 24 तासांत (म्हणजे 23 मार्च 2026 पर्यंत) नोंदवता येतील.

या यशस्वी आयोजनामागे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.

गडचिरोली पोलीस दलाने या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी (14 फेब्रुवारी ते 7 मार्च 2026) नंतर आता लेखी परीक्षा यशस्वीपणे पार पाडून पारदर्शक आणि निष्पक्ष भरतीची प्रतिबद्धता दाखवली आहे. उर्वरित प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल.

#Gadchiroli #police 
#gadchirolipolice.gov.in
#Gadchirolipolice 

Post a Comment

0 Comments