धारदार शस्त्राने तरूणाची निर्घन हत्या

गडचिरोली : पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने तरूणाची निर्घन हत्या केल्याची घटना आज सोमवार (ता.16) गडचिरोली शहरातील लांझेडा वॉर्डात साडेचार वाजताच्या सुमारास घडली. सचिन रामचंद्र कोलुरवार (वय 35) असे मृतक तरूणाचे नाव असून तो विवेकानंद नगर येथील रहिवासी होता. तर महेश बुरांडे असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कोल्हुरवार हा संविधान चौक परिसरात जनरल स्टोअर चालवत होता. तर आरोपी महेश बुरांडे हा फर्निचर व्यवसायिक असून दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पैशांच्या व्यवहारावरुन वाद सुरू होता. २०१९ मध्ये सचिनने महेश बुरांडे याला सुमारे सव्वा लाख रुपये फर्निचर बनवण्यासाठी दिले होते. मात्र, महेशने फर्निचर तयार करून दिले नाही व पैसेही परत केले नाही. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. सोमवारी महेशने सचिनला लांजेडा वाॅर्डातील आपल्या घरी, जिथे तो फर्निचर बनवण्याचे काम करतो, तिथे बोलावले होते. सचिन हा आपल्या परिचित दीपक नंदेश्वर याच्यासोबत त्या ठिकाणी गेला. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, आरोपी महेश बुरांडे याने हल्ल्याची पूर्वतयारी करून ठेवली होती. भांडणादरम्यान त्याने घराच्या आतून मिरची पावडर आणून अचानक सचिन आणि प्रत्यक्षदर्शी दीपक नंदेश्वर यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे दोघे काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत असताना महेशने संधी साधत फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार अवजाराने सचिनवर वार केले. या हल्ल्यात सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दीपक नंदेश्वर असून तो घटनेच्या वेळी सचिनसोबत उपस्थित होता. प्राथमिक माहितीनुसार, पैशांच्या देवाण-घेवाणीवरील वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटना घडताच आरोपी महेश बुरांडे हा फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments