गडचिरोली पोलिसांची तत्पर कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने राजगड परिसरातून आरोपी ताब्यात
गडचिरोली : नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानाच्या कुटुंबाची तब्बल २ कोटी १६ लाख ७९ हजार १०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पार पाडली.
सविस्तर माहिती अशी की, सन २०१३ मध्ये तोडगट्टा जंगल परिसरात पोलीस व माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पोलीस कर्मचारी गणपत नेहरू मडावी हे शहीद झाले होते. शहीद कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. त्यानुसार त्यांचा मुलगा सागर गणपत मडावी याने वर्ग-१ पदासाठी अर्ज केला होता.
दरम्यान, सन २०२२ मध्ये सागर मडावी पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी वरे (वय ३०, रा. वरोडी खुर्द, ता. भोर, जि. पुणे) याच्याशी झाली. आरोपीने मंत्रालयात ओळख असल्याचे भासवून अनुकंपा तत्वावर उपजिल्हाधिकारी (वर्ग-१) पद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले.
या आमिषाला बळी पडून सागर मडावी व त्यांची आई मीना मडावी यांनी आरोपी व त्याच्या इतर चार साथीदारांना वेळोवेळी रोख रक्कम, फोनपे व्यवहार तसेच एटीएमद्वारे एकूण २,१६,७९,१०० रुपये दिले. मात्र, नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी सागर मडावी यांनी २० एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४६९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) अन्वये ज्ञानेश्वर वरे व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू होताच पोलिसांनी तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड व गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मुसनवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० एप्रिल रोजी सायंकाळी राजगड (जि. पुणे) येथून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित चार फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


0 Comments