रानडुकराच्या हल्ल्यात तीन जण जखमी

खुर्सा येथील घटना
गडचिरोली : तालुक्यातील खुर्सा गावाजवळील जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून सुदैवाने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जखमींमध्ये राजू एकनाथ मेश्राम (४०), सावन पुरुषोत्तम चुधरी (२६) आणि चंदा आबाजी कठाणे (१६), सर्व रा. खुर्सा यांचा समावेश आहे. यापैकी राजू मेश्राम व चंदा कठाणे यांना किरकोळ दुखापत झाली असून सावन चुधरी यांच्या कमरेला मार लागला आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक सकाळी लवकर जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करत आहेत. याच अनुषंगाने खुर्सा येथील काही नागरिक आज सकाळी गावालगतच्या जंगलात गेले होते. दरम्यान, झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला चढवला. हल्ला होताच जखमींनी आरडाओरड केल्याने जवळच असलेल्या इतर नागरिकांनी तातडीने धाव घेतली. नागरिकांचा गोंधळ व आरडाओरड ऐकून रानडुकराने तेथून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच शासनाकडून नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जंगल परिसरात सतर्कतेची गरज तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामात नागरिकांनी जंगलात जाताना अधिक सावधगिरी बाळगावी, समूहानेच जंगलात जावे आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती मिळताच सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments