गडचिरोली :गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र तथा शहरातील परिचित युवा व्यक्तिमत्त्व अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (वय ३७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच गडचिरोली शहरासह जिल्हाभरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्यावर बुधवार, दिनांक १७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थान असलेल्या सावकार वाडा येथून अंतिमयात्रा निघणार आहे.
अमेय सावकार पोरेड्डीवार हे सामाजिक, व्यावसायिक तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत. त्यांच्या शांत, मनमिळावू आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार आणि परिचयाचा मोठा गोतावळा होता. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांचे वडील सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी गडचिरोली शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे . त्या कुटुंबाची सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील ओळख लक्षात घेता अमेय यांच्या निधनामुळे शहरातील नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
अंतिम दर्शनासाठी तसेच अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी उद्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्या अकाली जाण्याने सावकार पोरेड्डीवार कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला असून संपूर्ण गडचिरोली शहर शोकमग्न झाले आहे.
लोकप्रवाह परिवारातर्फे अमेय सावकार पोरेड्डीवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️🙏


0 Comments