गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा
गडचिरोली : राजकारण हे केवळ निवडणुका लढविण्याचे साधन नसून ते जनसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे. तरच जनतेचा विश्वास जिंकून संघटना अधिक मजबूत करता येईल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
गडचिरोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) भव्य पदाधिकारी - कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्यात डॉ. आत्राम यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. “पक्ष संघटना समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व म्हणून रवींद्र वासेकर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांनी आगामी काळातही याच जिद्दीने पक्षाची धुरा सांभाळावी, असे विश्वासपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे संकेत देत, डॉ. आत्राम यांनी कार्यकर्त्यांना बूथ बळकटीकरण मोहिमेवर भर देण्याचे आवाहन केले. “प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे संघटन मजबूत असणे हीच विजयाची गुरुकिल्ली आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करून सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष जनसंपर्क या दोन्ही आघाड्यांवर सक्रिय राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राजकारणातील चढ-उतारांवर भाष्य करताना ते म्हणाले की, यश-अपयश हे राजकारणाचा भाग आहेत. पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने काम करणे हाच खरा गुणधर्म आहे. टीका आणि अफवांकडे दुर्लक्ष करून आपल्या विकासकामांतूनच विरोधकांना उत्तर द्या.
या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख, युवक, महिला कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. डॉ. आत्राम यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक जोमाने उभारायचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


0 Comments