केवळ एका अधिकाऱ्यावर खापर न फोडता संपूर्ण प्रकरणाचे क्लिनिकल व २.६२ कोटींच्या मानधनाचे आर्थिक ऑडिट करण्याची मागणी

गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; डॉ. वर्षा लहाडे यांच्या निलंबनावरून आजाद समाज पार्टी आक्रमक
गडचिरोली: जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयातील माता-बाल मृत्यूच्या घटनांनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर आजाद समाज पार्टीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी निश्चित न करता केवळ एका प्रशासकीय प्रमुखाला बळीचा बकरा बनवले जात आहे का, असा सवाल करत पक्षाने या संपूर्ण प्रकरणाचे वैद्यकीय (Clinical) आणि आर्थिक ऑडिट करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी व आजाद समाज पार्टीचा सवाल
शासनाने १६ सप्टेंबर रोजी पर्यवेक्षकीय जबाबदारीत निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना आजाद समाज पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, पक्ष कोणत्याही दोषी अधिकाऱ्याचे समर्थन करत नाही. मात्र, गडचिरोलीत इतर प्रकरणात "आधी चौकशी, नंतर कारवाई" असा निकष लावला जातो, मग या प्रकरणात चौकशीचा अंतिम अहवाल येण्यापूर्वीच एकाच अधिकाऱ्याला जबाबदार धरणे कितपत न्याय्य आहे?
उपचार प्रक्रियेतील त्रुटी आणि चौकशी समितीची निरीक्षणे
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथे रेफर केलेल्या जिजा हंसराज सातर प्रकरणाचा आणि चौकशी समितीच्या अहवालाचा दाखला देत पक्षाने काही महत्त्वाचे वैद्यकीय प्रश्न उपस्थित केले:
 * बाळंतपणादरम्यान Fetal Heart Rate मधील बदल, Clinical Escalation आणि उपचाराच्या निर्णयातील संभाव्य विलंब याला जबाबदार कोण?
 * घटनेच्या वेळी प्रत्यक्ष ड्युटीवर असणारे डॉक्टर कोण होते आणि त्यांनी तात्काळ Operative Intervention का केले नाही?
 * केवळ प्रशासकीय प्रमुखावर कारवाई करून प्रत्यक्ष उपचार प्रक्रियेत त्रुटी ठेवणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोकळे सोडले जात आहे का?
₹२.६२ कोटींच्या मानधनाचे आणि C-Section चे आर्थिक ऑडिट करा
कागदपत्रांनुसार सप्टेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत IPHS/NHM अंतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञांच्या मानधनावर सुमारे ₹२.६२ कोटींचा सार्वजनिक निधी खर्च झाला आहे.
 * C-Section चे प्रमाण कमी झाल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनात सुमारे ₹१२.२९ लाखांची घट झाल्याचे समोर आले आहे.
 * यामुळे शासकीय खर्च कमी करणाऱ्या निर्णयांचे स्वागत करण्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत या मानधन रचनेचा वैद्यकीय निर्णयांवर काही अप्रत्यक्ष प्रभाव पडतो का, याची सखोल आर्थिक व वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

राजकीय दबावातून कारवाईचा आरोप
जिल्ह्यातील काही प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि हितसंबंधी घटकांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपाला विरोध केल्यामुळे डॉ. लहाडे यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई करण्यात आली आहे का, असा गंभीर आरोपही आजाद समाज पार्टीने केला. या कथित राजकीय हस्तक्षेपाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
पत्रकार परिषदेला आजाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, युवा आघाडीचे प्रतिक डांगे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, आरमोरी तालुका सचिव सुरेंद्र वासनिक व युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे हे उपस्थित होते.

आजाद समाज पार्टीच्या प्रमुख मागण्या:
 * चामोर्शी व गडचिरोलीतील सर्व माता-बाल मृत्यूंचे एकत्रित स्वतंत्र Clinical Audit करण्यात यावे.
 * प्रत्यक्ष उपचार करणारे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करावी.
 * विशेषज्ञ डॉक्टरांच्या ₹२.६२ कोटींच्या मानधनाचे स्वतंत्र आर्थिक ऑडिट करावे.
 * C-Section च्या संख्येत झालेला बदल व मानधनातील ₹१२.२९ लाखांच्या घटीबाबत अधिकृत अहवाल जाहीर करावा.
 * डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह इतर कोणत्याही डॉक्टर अथवा कर्मचाऱ्याचा दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करावी.
 * आरोग्य व्यवस्थेतील कथित राजकीय हस्तक्षेपाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून अंतिम अहवाल जनतेसमोर आणावा.

 

Post a Comment

0 Comments