गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजना दिन नूकताच साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रमोद जावरे, शिक्षकेतर कर्मचारी शशि कुळमेथे , संजय राठोड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रम समन्वयक प्रमोद जावरे म्हणाले, युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे असून प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय.

राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम ,राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी या भावना वाढीस लागतात.
     
   विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपल्या विद्यापीठाचा परिसर देखील स्वच्छ ठेवायला हवा. स्वच्छ परिसरामुळे मन प्रसन्न राहते असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. 

पदव्युत्तर शैक्षणिक 
 विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला आणि विद्यापीठाचा परिसर स्वच्छ करुन राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा केला.

Post a Comment

0 Comments