झाडीपट्टीला मोठी मदत मिळवून देणार - आमदार विजय वडेट्टीवार यांची ग्वाही



विसोरा ; झाडीपट्टीच्या नाटकांनी आता बदल स्विकारला पाहिजे. स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे कलाकारांना चांगल्या दर्जाचे मंच मिळावे. झाडीपट्टीचा कलावंत फार गुणी आहे. झाडीपट्टीला नक्कीच मोठी मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ब्रह्मपुरी शहरातील पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आयोजित चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज, 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून ते बोलत होते. उद्घाटन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी निर्देशक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अभिनेते, लेखक, गायक अनिरुद्ध वनकर होते. संमेलनाला मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद (भोसले) यांची विशेष उपस्थिती होती. तर कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, ब्रम्हपुरी नपंचे उपनगराध्यक्ष अशोक रामटेके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष डॉ. नरेश गडेकर, डॉ. परशुराम खुणे, डॉ. शेखर डोंगरे, गणपत वडपल्लीवार, खेमराज तिडके, विलास विकार, प्रमोद चिमूरकर, प्रभाकर शेलोकर, कायरकर,  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शेखर डोंगरे, संचालन मंगेश मेश्राम तर आभार हिरालाल सहारे यांनी मानले. संमेलनाला झाडीपट्टी रंगकर्मी, कलाकार, रसिक उपस्थित होते.
.............
झाडीच्या नाटकाने जागतिक स्तर गाठावा : अनिरुद्ध वनकर 
आजपासून वीस वर्षांपूर्वी झाडीपट्ट नाटकांचे विषय, त्यातील कलाकार, प्रसंग जसे होते त्यात आता वीस वर्षानंतर बदल होणे ही काळाची गरज आहे. नव्या पिढीकडे मोबाईल आणि नवनवे मनोरंजनाचे साधन आले. अशा नूतन रसिकांना झाडीपट्टीच्या नाटकांकडे आकर्षित करण्यासाठी झाडीच्या नाटकाने जागतिक स्तर गाठला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते, लेखक, गायक अनिरुद्ध वनकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments