कंबालपेटा ते टेकडा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चारचाकी वाहतूक बंद


दुचाकी व सायकलस्वारांना जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास lokpravah.com


सिरोंचा : तालुक्यातील पुसकपली जवळील पुलाचा काही भाग अतिवृष्टी व पुराने वाहून गेल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. दुचाकी व सायकलस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्याच्या समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे.
टेकडा ते कंबालपेटा हा मार्ग सिरोंचा-अहेरी या राष्ट्रीय जोडणारा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर असलेल्या जिलेडा नाल्यावरील पुलाची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन या नाल्यावरून पाणी वाहत होते. पुरामुळे जवळपास १५ दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद होती. पाण्याच्या प्रवाहाने पुलाचा काही भाग डांबरीकरणासह वाहून गेला. त्यामुळे जवळपास पाच किमी रस्त्यावरील वाहतूक एका पुलाच्या दुर्दशेमुळे प्रभावित झाली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे.
टेकडा ते कंबालपेटा हा महत्वाचा मार्ग असून वाहनांची नेहमीच रेलचेल सुरु असते. मात्र, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी टेकडा परिसरातील नागरिकांना तालुका मुख्यालयी ये-जा करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे टेकडा ते कंबालपेठा दरम्यानच्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परीसरातील नागरिकांतुन केली जात आहे.

नवीन पुलाचे बांधकाम करा
कंबालपेटा ते टेकडा या ५ किमीच्या नादुरुस्त रस्त्याचा वाली कोणी नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अवघ्या ५ किमीच्या प्रवासासाठी अर्ध्याहून अधिक तास वेळ लागत आहे. तसेच पुसुकपली जवळील जिलेडा नालावरील पूल वाहून गेल्यामुळे चारचाकी वाहनांचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.

पाच गावांच्या प्रवासात अडथळा
अतिवृष्टीमुळे जिलेडा पुलावरील डांबरीकरण वाहून गेल्याने पूल क्षतिग्रस्त झाला आहे. सोबतच सदर रस्त्याची पूर्णतः चाळण झाल्यामुळे परिसरातील पुसुकपली, नेमडा, टेकडा ताला, जाफ्राबाद, मोकेला या गावांच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. नादुरुस्त रस्ता व पुलाकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाने लक्ष घालून दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments