मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना सरसकट मदत करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी lokpravah.com

अन्यथा तहसील कार्यालयांवर मोर्चे काढणार



गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनी चुकीचे आणि बेजबाबदारपणे पंचनामे केल्याने हजारो शेतकरी सदरच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेऊन पुरवणी प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. आणि आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेली मदत ही अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाची आहे. त्यात स्थानिक कर्मचाऱ्यांनी पंचनामे करतांना अर्धवट आणि चुकीचे पंचनामे केल्याने नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान होवूनही सरकारची मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होताच थेट वैनगंगा नदीकाठावर भेट देवून पुरपाहणी करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारच्या काळातही हजारो शेतकऱ्यांची दिवाळी मदतीशिवाय साजरी करण्याची पाळी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

त्यामुळे मदतीपासून वंचित अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांची तहसील कार्यालयाच्या माध्यमातून दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारकडे पुरवणी प्रस्ताव तातडीने सादर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभरातील तहसील कार्यालयांवर शेतकऱ्यांचे मोर्चे काढण्यात येतील असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, रमेश चौखुंडे, दामोदर रोहनकर, प्रदिप आभारे, गंगाधर बोमनवार, चंद्रकांत भोयर, अशोक किरंगे, बाजीराव आत्राम, देवेंद्र भोयर, मारोती आगरे, देवराव शेंडे, देविदास मडावी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments