प्रशासनाची स्पष्ट भूमिका, कांगावा करणारे करताहेत दिशाभूल
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील लॉयड्स मेटल्स कंपनीला सुरजागड येथील लोहखनिज उत्खननासाठी 348.09 हेक्टर आर. जागेची लीज मिळाली आहे. मात्र, कोनसरी येथील प्रस्तावित लोहप्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी सदर कंपनीने लोहखनिज काढण्याची मर्यादा 3 दशलक्ष टन प्रतिवर्ष यावरून 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष एवढी वाढविण्याची मागणी केली आहे. यामुळे सुरजागड खाण परिसरातील कोणत्याही गावाला कोणतीही हानी होणार नसून कोणालाही विस्थापित व्हावे लागणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे यासंदर्भात केला जात असलेला कांगावा कशासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर खाणीमुळे परिसरातील 13 गावे विस्थापित होणार असे सांगून परिसरातील नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एटापल्ली येथील काही नागरिकांनी जिल्हाधिका-यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गावे विस्थापित होण्यासंदर्भात आपल्याकडे कोणाचीही तक्रार अद्याप आलेली नाही, गावे विस्थापित होणार असल्याची खोटी माहिती कोणी आणि कशाच्या आधारावर पसरविली यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.
सुरजागड प्रकल्पाच्या लोहखनिजामुळे जिल्ह्याला मोठा महसूल मिळत आहे. त्याचा उपयोग विकासात्मक कामांसाठी होणार आहे. याशिवाय लोहप्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे अशा दोन्ही भूमिकांमध्ये लोक दिसतात. मात्र, विरोध करणारे लोक अर्धवट आणि चुकीच्या माहितीवर गैरसमज पसरवीत असून त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
........................
गुरुवारला होणार गडचिरोलीत जनसुनावणी
सुरजागड लोहखाणीच्या लीजसंदर्भातील वाढीव क्षमतेसाठी सादर प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी येत्या गुरुवारी 27 ऑक्टोबरला गडचिरोली येथे ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणा-या या जनसुनावणीत जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासासोबत प्रशासनाची बाजूही स्पषट होणार आहे.
0 Comments