माडिया, गोंड जमातीचे अस्तित्व धोक्यात आल्याने सुरजागडच्या वाढीव उत्खननाला विरोध करा : डाव्या आघाडीचे आवाहन lokpravah.com

वर्षभरात जवळपास ६२ लोकांचा मृत्यू


गडचिरोली : सध्या सुरू असलेल्या वार्षिक ३ दशलक्ष टन उत्खननामुळे रस्त्यांची झालेली बकाल अवस्था आणि त्यामुळे वर्षभरात जवळपास ६२ लोकांचा मृत्यू, एक आदिवासी शेतकरी आत्महत्या आणि येलचील येथील आदिवासी महिलेवर ट्रक ड्रायव्हर कडून झालेल्या बलात्काराला जबाबदार असलेल्या सुरजागड लोह खाणीतून आता तीन पटीने उत्खनन करण्यासाठी २७ आक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून या जनसुनावणीला जिल्ह्यातील ग्रामसभा, आदिवासी व अन्य स्थानिक जनता, भांडवलशाही विरोधी डावे आंबेडकरवादी आणि पुरोगामी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लेखी विरोध करावा, असे आवाहन डाव्या आघाडीने केला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. महेश कोपूलवार, शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. अमोल मारकवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात संविधानाची पाचवी अनुसूची लागू आहे. पेसा आणि वनाधिकार कायद्यान्वये ग्रामसभांना स्वयंशासनाचे अधिकार तसेच गौण वन उपजाचे मालकी हक्क मिळालेले असतांनाही रोजगाराच्या नावाखाली सुरजागड सह २५ लोह खाणी खोदण्याचे षडयंत्र खासगी कंपन्यांनी रचले आहे. प्रशासकीय बळजबरी आणि दलालांना हाताशी धरून सामान्य जनतेच्या साधनसंपत्तीची खुली लुट सुरजागड खाणीच्या माध्यमातून केली जात आहे.


सुरजागड लोह खाणीला ग्रामसभांचे ठराव, निवेदन, मोर्चे, आंदोलन करुन विरोध करणाऱ्या स्थानिकांना कारवाईचा धाक दाखवून बळजबरीने लोहदगड वाहतुक केली जात आहे. शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी सुरजागड खाण, शेतकरी आत्महत्या आणि रेती तस्करी विरोधात आवाज उठविल्याने त्यांना आणि खदानविरोधी कार्यकर्त्यांना जिल्हा प्रशासनाने अनेक खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे शर्तीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र जनतेने हक्क आणि अधिकारांसाठी संघर्ष सुरुच ठेवावा. तसेच सध्या सुरू असलेल्या साधारण दोन हजार वाहनांमुळे अपघातांची मोठी मालिका सुरू झाली आहे. आता तीन पटीने उत्खनन झाले तर गडचिरोलीचे संपूर्ण वैभव आणि नंदनवन बेचिराख होण्याची नामुष्की ओढवली असल्याने येथील जनतेने या खाणीचा जनसुनावणीत सहभागी होवून विरोध करावा असे आवाहनही डाव्या आघाडीने केला आहे.

Post a Comment

0 Comments