थकीत वेतन दिवाळीपूर्वी अदा करा, शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांचे निर्देश

दिवाळीपूर्वी होणार अहेरी प्रकल्पातील शिक्षकांचे वेतन


गडचिरोली : अहेरी प्रकल्पातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी अदा करा, असे निर्देश शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांनी दिले. यावर प्रकल्प अधिकारी यांनी वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केल्याने या प्रकल्पातील शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे.

नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आ. सुधाकर अडबाले यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्‍या 'समस्या तुमच्या पुढाकार आमचा' या 'विमाशि' संघाच्या उपक्रमांतर्गत अहेरी प्रकल्पाअंतर्गत शासकीय/अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा सोमवारी अहेरी प्रकल्प अधिकारी कार्यालयात पार पडली. ही सभा तब्बल चार तास चालली. यावेळी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पात येणारी सर्व प्रकरणे टोकण पद्धतीने स्विकारून निकाली काढावे. प्रकल्पांतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तात्काळ करावे. कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा 1 तारखेला अदा करावे. कार्यालयासमोर सेवा हमी कायदा फलक लावा. प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आ. अडबाले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सूर्यभान डोंगरे, भिवगडे, वसावे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष कैलास भोयर, विभागीय अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष यादव धानोरकर, रामदास खवशी, गजानन लोनबले, के. जी. दिवसे, रेवनाथ लांजेवार, पत्रे, सूर्यवंशी, मारोती गौरकर, गणेश पहापळे, शेषाद्री मामिडालवार आदींसह प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी व समस्याग्रस्त आश्रमशाळेतील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments