अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी



-आलापल्ली -एटापल्ली मार्गावरील घटना

अहेरी : आलापल्लीवरून एटापल्लीकडे जाणा-या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचिल गावाजवळ घडली. 

सचिन नागुलवार (34) रा. अहेरी असे मृतकाचे तर शंकर येडगेम (27) रा. इंदाराम ता. अहेरी असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सचिन व शंकर हे दोघे दुचाकीने आलापल्लीवरून एटापल्लीकडे जात होते. दरम्यान, येलचिल गावापासून एक किमी अंतरावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सचिन नागुलवार याचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर येडगेम हा जखमी झाला. अपघात घडताच अज्ञात चालक वाहन घेवून घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच येलचिल पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. घटनेसंदर्भात येलचिल पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक सचिन नागुलवार याचा दोन वर्षाअगोदर विवाह झाला होता. त्याच्या मृत्यूने कुटूंबावर मोठा आघात झाला आहे.

Post a Comment

0 Comments