हत्तींकडून धान पुंजणे, मका पिकाची नासधूस

- कुरखेडा तालुक्यातील उराडी परिसरात हत्तींचा उपद्रव


कुरखेडा : मागील एक ते दीड महिना गडचिरोली तालुक्यात हैदोस माजविणा-या सोमवारी रात्री कुरखेडा तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रात एन्ट्री केली. येथे दाखल होताच हत्तींच्या कळपाने रात्रीच्या सुमारास उराडी येथील धान पुंजणे व मका पिकाची नासधूस केल्याने पुन्हा एकदा कुरखेडा तालुक्यातील शेतक-यांवर संकट कोसळले आहे.

रांगी वनपरिक्षेत्रातून हत्तींचा कळप मागील आठवड्यात पोर्ला वनपरिक्षेत्रातील चांभार्डा, डार्ली, वडधा शेतशिवारात दाखल झाला होता. चार दिवसांपूर्वी हत्तींनी चांभार्डा व डार्ली येथील शेतक-यांच्या ट्रॅक्टरमध्ये पोत्यांमध्ये भरलेल्या धानाची नासधूस केली होती. त्यानंतर हत्तींचा कळप सोमवारला रात्रीच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रात दाखल झाला. 

कुरखेडा तालुक्यात सध्या धान पिकाची कापणी जवळपास पूर्ण झालेली आहे. मात्र मळणी बाकी असल्याने अनेक शेतक-यांच्या धान पिकाचे पुंजणे शेतातच आहे. काही शेतक-यांनी रबी हंगामात मका पिकाची लागवड केली आहे. सोमवारला रात्री दाखल झालेल्या 20 ते 25 च्या संख्येत असलेल्या हत्तींच्या कळपाने उराडी येथील शेतात हैदोस माजवत पत्रूजी कांबळे, हरीदास कांबळे, शिवनाथ दडमल, पूरषोत्तम गरमडे, शंकर दडमल, यशवंत वैरागडे, कालीदास कोल्हे, श्रीराम गरमडे, गजानन चौधरी, एकनाथ सयाम व अमीत तुलावी रा. वासी यांचे धान पुंजणे व मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच देलनवाडी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. मेहर, क्षेत्रपाल एस. व्ही. नारनवरे, वनरक्षक कुळमेथे व वनकर्मचा-यांनीनी घटनास्थळावर पोहचत नुकसानीचे पंचनामे केले.

बॉक्स.....
गडचिरोली, धानोरा तालुका फिरून पुन्हा कुरखेडा तालुक्यात

मागील तीन वर्षांपासून कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी तालुक्यात हैदोस माजविल्यानंतर हत्तींचा कळप एक महिन्यापूर्वी भ्रमंती करीत गडचिरोली तालुक्यात दाखल झाला होता. तालुक्यातील दिभना, अमिर्झा, चातगाव, रांगी परिसरात नुकसान केल्यानंतर हत्तींचा कळप मागील आठवड्यात मौशीखांब परिसरात दाखल झाला. या परिसरातील धानपिकासह मळणी केलेल्या धानाचेही हत्तींनी मोठे नुकसान केले. सोमवारला हत्तींचा कळप पुन्हा ज्याठिकाणाहून आला त्याच कुरखेडा तालुक्यात पोहोचला आहे. त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

Post a Comment

0 Comments