रानटी हत्तींचा हैदोस; पाच घरांची पडझड

जीवनावश्यक साहित्यांसह शेतपिकांचीही नासधूस


आरमोरी : गोदिंया जिल्ह्यातून परत गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणा-या रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा उच्छाद मांडला आहे. मागील काही दिवसांपासून आरमोरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत हत्तींचा संचार कायम असून रविवारच्या किर्रर्र रात्री रानटी हत्तींच्या कळपाने पाथरगोटात हैदोस घालित गावातील पाच घरे नेस्तनाबुत केली. यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हत्तींनी घरातील साहित्यांसह धान, तांदळासह शेतातील पिकांचीही नासधूस केल्याने पाथरगोटासह परिसरातील नागरिकांमध्ये हत्तींची दहशत कायम आहे.




मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात उच्छाद मांडणा-या 20 ते 24 संख्येत असलेल्या रानटी हत्तींनी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आठवड्याभरातच हत्तींनी परत कुरखेडा तालुका हद्दीतून जिल्ह्यात प्रवेश केला. प्रारंभी देसाईगंज तालुक्यातील शंकरपूरसह परिसरात उच्छाद मांडणा-या हत्तींनी आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावाकडे वळविला. जंगल परिसराला लागून असलेल्या पाथरगोटा येथे हत्तींनी रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास प्रवेश करीत उच्छाद मांडल्याने हत्तींच्या या आक्रमक स्वभावाचे पाथरगोटा वासीयांना पुन्हा दर्शन घडले. रानटी हत्तींनी गावातील अशोक राऊत, सुरज दिघोरे, मंगल प्रधान, चंद्रशेखर बगमारे, दुर्गादास बगमारे यांच्या घरावर हल्ला चढवित घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. वेळीच कुटूंबिय घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. दरम्यान हत्तींनी घरातील धान, तांदूळ, अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्यांची प्रचंड नासाडी केली. यात संबंधितांचे प्रचंड नुकसान झाले असून अन्न, वस्त्र, निवा-यापासून ते बेघर झाले आहेत.

घटनेची माहिती प्राप्त होताच आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांना मिळताच आज, सोमवारी सकाळीच वनविभागाचे पथक गावात रवाना करण्यात आले. आरएफओ मेश्राम यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक किनेकर, वनरक्षक अतकरे, एफडीसीएम क्षेत्र सहाय्यक शिऊरकर, वनरक्षक अनिता लट्टाये, पंढरी, तेलंग, गजानन ठगे, सुधाकर राठोड आदींसह वनविभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.



इन्फो...
वनविभागासह हुल्ला पार्टी पाळतीवर

घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाच्या पथकाद्वारे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. हत्तींद्वारे 3 ते 4 घरांची पडझड करण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यक साहित्यांसह नासधूस झाली आहे. गावालगतच्या काही शेतपिकांचेही नुकसान झाले आहेत. सद्यस्थितीत हत्ती पाथरगोटा-पळसगाव-डोंगरगाव परिसरात संचारत असून कळपावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाचे पथक गस्तीवर आहेत. तसेच हुल्ला पार्टीचे पथकही यासाठी सज्ज असून हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

अविनाश मेश्राम, 
वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी

Post a Comment

0 Comments