- कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार
गडचिरोली. मुलभूत सोयीसुविधांच्या कमतरतेने पछाडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहणार आहेत. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉयड मेटल्स व ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करार झाले आहेत. यातून ही नवी क्रांती घडणार आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे लॉयड मेटल्स एनर्जी तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठासोबत सामंजस्य करारांचे राजभवनात आज बुधवारी (दि. 7) आदानप्रदान करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार परिणय फुके, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे संविधानिक अधिकारी व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठ व लॉयड मेटल्स यांच्यात गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये जुळे कार्यक्रम (ट्विनिंग डिग्री) आयोजित करण्याबाबत करार करण्यात आला. याचे सकारात्मक व दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
0 Comments