गडचिरोली : जिल्ह्यातील पारंपारिक आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उध्वस्त करून लोह खनिजांची लुट करण्यासाठी भांडवलदारांना मोकळीक देणाऱ्या फडणवीस सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील इतर समस्यांकडे डोळेझाक केली. जिल्ह्यात सर्वत्र लाल चिखल आणि समस्याच समस्या उभ्या राहिल्या असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, फडणवीस सरकारने विकास आणि रोजगारांच्या नावावर खनिज संपत्तीच्या खुल्या लुटीचा सपाटा लावला आहे. त्या नादात जनतेच्या इतर अडचणींकडे शासनाचे लक्ष राहिले नाही. जिल्ह्यातील अनेक आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षणाची व्यवस्थाच राहीली नसून लाहेरीच्या आश्रमशाळेत केवळ तीनच शिक्षक आहेत. मलेरियाने अनेकांचा बळी जावूनही आवश्यक सुविधा पोहचलेल्या नाहीत. भामरागड तालुक्यात एकही बेलिब्रीज पुर्ण होवू शकला नसून कवंडे सारख्या अनेक गावांमध्ये जायला रस्तेच उपलब्ध नाहीत. अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. कोरची, कुरखेडा, धानोरा, एट्टापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील रस्ते वर्षभरात खड्ड्यात गेलेले आहेत. तरीही रस्ते आणि पुलांचा निधी कुठे गेला याची चौकशी होत नसल्याने गेल्या तीन वर्षांत बांधकाम विभागाच्या अधिक्षक व कार्यकारी अभियंत्यांनी ३५० कोटींपेक्षा अधिकचा निधी स्वतःच्या घशात घातला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्या गेलेला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांचे १५ हजार टन खतांची बेकायदेशीरपणे लगतच्या जिल्ह्यात तस्करी करुन काळाबाजार करण्यात आला आहे. आदिवासी विकास महामंडळ व मिलर्सनी शासनाला कोट्यवधी रुपयांचा चूना लावलेला आहे.रेती आणि दारू तस्करीतही मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्याने उच्चांक गाठला असून तस्करांना अभय देणारे अधिकारी मोकाट आहेत. अनेक विभागांत प्रमुख अधिकारी हे प्रभारी असून गडचिरोली जिल्हा समस्यांच्या गर्तेत सापडला असून विकास आणि रोजगारांच्या नावाखाली स्थानिकांना कंगाल करण्याचे काम होत आहे. ज्या जिल्ह्यातील जैविक विविधतेने समृद्ध नैसर्गिक जंगल नष्ट करून वृक्षारोपणाचे फर्जीवाडा केला जाणार आहे तिथे मुख्यमंत्री हे स्वतः पालकमंत्री असूनही जिल्ह्यातील समस्या मार्गी लागत नसतील तर फडणवीसांनी तातडीने पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.
0 Comments