गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःहुन गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. मात्र, जिल्ह्याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. जिल्ह्यातील मोजके दौरे वगळता जिल्हा विकासाच्या दृष्टीकोनातून एकही दौरा केला नाही. जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात रोजगार, आरोग्य , शिक्षणावर विकासात्मक कामे दिसून आली नाहीत. उद्या ते गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याला काय रिटर्न गिफ्ट देणार? असा प्रश्न काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सोमवार (ता.21) विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
यावेळी आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, प्रभाकर वासेकर, शंकररावजी सालोटकर, रमेश चौधरी, मिलिंद खोब्रागडे, वामन सावसागडे, घनश्याम वाढई, वसंता राऊत, रजनीकांत मोटघरे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे म्हणाले, खऱ्या अर्थाने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) यांनी जिल्ह्याला विकासाची दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक दौरे करून जनतेच्या समस्यांचे निराकरण केले. स्थानिक आदिवासी, ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय सुरू केले. महिला रुग्णालय मंजुर करून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे रहावे यासाठी इमारतींचे बांधकाम केले. दळणवळणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन राज्यांना जोडणारा कालेश्वर ब्रिज तयार केला. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या याकरिता स्थानिक पातळीवर पोलिस भरती प्रक्रिया राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या तीन वर्षांतील कार्यकाळात जिल्ह्यात 2 हजाराहुन अधिक विविध पदे रिक्त आहेत. अर्ध्या शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळाले नाही. रानटी डुकर व हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही, अशा अनेक समस्या जिल्ह्यात आवासून उभ्या असतानासुद्धा जिल्ह्याचे पालकत्व स्विकारूनही त्याकडे दुर्लक्ष करीत उद्योगपती मित्रांचा भला करण्यासाठीच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचा अारोप जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.
पालकमंत्र्यांचा वाढदिवस काँग्रेस कमिटी कार्यालयात होणार साजरा
विकासाच्या थापा मारणारे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवार 22 जुलैला जनतेला चॉकलेट व लालीपॉपचे वाटप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.
0 Comments