गडचिरोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गडचिरोलीसह राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 सप्टेंबर रोजी दुपारनंतर गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भातील यवतमाळसह गडचिरोली आणि शेजारील भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
0 Comments