वरिष्ठ माओवाद्यांसह सहा नक्षलवाद्यांचे पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण

गडचिरोली :  महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील जहाल माओवाद्यांनी आज एका मोठ्या घटनेत आत्मसमर्पण केले. जिल्हा वरिष्ठ माओवादी डिव्हीसीएम भिमन्ना उर्फ व्यंकटेश उर्फ सुखलाल मुत्तय्या कुळमेथे आणि त्यांची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम आणि एक एसीएम पदावरील एकूण सहा नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासमोर शरणागती पत्करली. या घटनेमुळे नक्षलविरोधी अभियानाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, स्थानिक पोलिस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलिसबल (सीआरपीएफ) यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे.
श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या या आत्मसमर्पण सोहळ्यात माओवाद्यांनी आपल्या शस्त्रांचा त्याग करून शांततेने सामान्य जीवनात परतण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यांवर एकत्रितपणे जाहीर केलेले एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस त्यांना मिळणार असून, हे बक्षीस त्यांच्या आत्मसमर्पणाच्या निर्णयाचे प्रोत्साहन म्हणून ठेवण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निमित्ताने नक्षलपिडीत कुटुंबियांना धनादेश वितरण करून त्यांना आर्थिक आधार उपलब्ध करून दिला.

या वर्षी सन २०२५ मध्ये गडचिरोली पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त मोहिमांमुळे आतापर्यंत एकूण ४० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. हे आकडे नक्षलविरोधी अभियानाच्या यशाचे द्योतक असल्याचे पोलिस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "नक्षलवाद हा सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा परिणाम आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे प्रयत्न सुरूच राहतील."
नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि जवानांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अपर पोलिस अधीक्षक (अभियान), अपर पोलिस अधीक्षक अहेरी आणि सी-६० च्या अधिकाऱ्यांसह जवानांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागात धैर्याने काम करून अनेक यश मिळवले असल्याचे कौतुक करण्यात आले.

याशिवाय, श्रीमती रश्मि शुक्ला यांनी अतिसंवेदनशील नवनिर्मित पोस्ट कवंडे येथे भेट देऊन जवानांशी संवाद साधला. तिथे त्या म्हणाल्या, "तुमचे धैर्य आणि समर्पण हे अभियानाच्या यशाचे आधारस्तंभ आहेत. सुरक्षिततेच्या प्रत्येक उपाययोजना शासनाकडून केल्या जातील." या भेटीदरम्यान जवानांनीही आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या.
या आत्मसमर्पणामुळे गडचिरोलीतील नक्षल प्रभाव कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवल्या असून, आत्मसमर्पण करणाऱ्यांना प्रशिक्षण, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या घटनेचे पुढील तपशील जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केले जाणार आहेत.
………………………………………………………………………………...

महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासह मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा आज दिनांक 24/09/2025 रोजी पार पडला. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 716 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 24/09/2025 रोजी सहा वरिष्ठ जहाल माओवादी नामे 1) भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम) वय 58 वर्षे, रा. करंचा ता. अहेरी, जि. गडचिरोली, 2) विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक, (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज), वय 56 वर्ष, रा. मांड्रा, ता. अहेरी, जि. गडचिरोली, 3) कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम), वय 34 वर्षे, रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली, 4) नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र. 10), वय 39 वर्षे रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.), 5) समीर आयतू पोटाम, (पिपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टिम), वय 24 वर्षे, रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.), 6) नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी, (एसीएम, अहेरी दलम), वय 28 वर्षे, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली यांनी मा. पोलीस महासंचालक म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण 11 जहाल माओवाद्यांनी तसेच दिनांक 06 जून 2025 रोजी डिव्हीसीएम सपनाक्का बुचय्या चौधरी सह एकुण 12 जहाल माओवाद्यांनी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता.  

मा. पोलीस महासंचालक म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या भेटीदरम्यान पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मौजा कवंडे जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये 01 दलम कमांडरसह एकूण 04 कट्टर माओवाद्यांना; दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी मौजा कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात 01 पीपीसीएमसह एकूण 04 माओवाद्यांना तसेच दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मौजा मोडस्के जंगल परिसरात 01 कमांडरसह 02 जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणा­या या तिनही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा मा. पोलीस महासंचालक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच मौजा कवंडे आणि कोपर्शी-फुलनार चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश आणि मौजा मोडस्के चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यासोबतच दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी पोस्टै राजाराम (खां.) हद्दीतील मौजा कापेवंचा येथील रहिवासी रावजी चिन्ना आत्राम तसेच दिनांक 01 फेब्राुवारी 2025 रोजी पोस्टे भामराग हद्दीतील मौजा कियर येथील रहिवासी सुखराम महागु मडावी यांची माओवाद्यांनी पोलीसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या केली होती. या दोन्ही मयत नागरिकांच्या कुटंुबियांना मा. पोलीस महासंचालक म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील  करण्यात आले. यावेळी मा. पोलीस महासंचालक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सी-60 चे अधिकारी व जवान यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले.
त्यानंतर गडचिरोली पोलीस दलामार्फत दिनांक 09 मार्च 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे भेट देऊन पोस्टे कवंडे येथील जवानांच्या अभियानाच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ व सी-60 च्या जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली. 


        या विविध कार्यक्रमांसाठी मा. डॉ. श्री. छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ), नागपूर, श्री. अजय कुमार शर्मा, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. सत्य साई कार्तिक अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) व श्री. गोकुल राज जी. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली, श्री. सुमित वर्मा, उप-कमांडंट (इंट) सिआरपीएफ, श्री. अनिकेत हिरडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा तसेच श्री. विशाल नागरगोजे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) हे उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
1) भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे 
 * दलममधील कार्यकाळ

* माहे जुलै 1992 मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन एक महिना काम केले.
* माहे ऑगस्ट 1992 मध्ये अहेरी दलम मधून चामोर्शी दलममध्ये बदली होऊन सन 1994 पर्यंत काम केले.
* सन 1994 मध्ये चामोर्शी दलम मधून माड डिव्हिजन मधील डीके प्रेस टीममध्ये बदली होऊन सन 1997 पर्यंत काम केले. 
* सन 1997 मध्ये ए सी एम पदावर पदोन्नती होऊन सन 1998 पर्यंत काम केले. 
* सन 1998 मध्ये डी के प्रेस टीम मधील प्रेस कमिटीच्या कमांडर पदावर पदोन्नती होऊन सन 2004 पर्यंत काम केले
* सन 2004 मध्ये डी के प्रेस टीम मधून कुतूल एरिया कमिटीमध्ये सचिव पदावर बदली होऊन सन 2006 पर्यंत काम केले.
* सन 2006 ला डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन कुतूल एरिया कमिटीमध्ये सन 2008 पर्यंत काम केले.
* सन 2008 मध्ये कुतुल एरिया कमिटी मधून पूर्व बस्तर डिव्हिजन मधील कंपनी क्र. 06 च्या प्लाटून क्रमांक 03 मध्ये कमांडर पदावर बदली होऊन सीवायपीसी पदावर सन 2009 पर्यंत काम केले.
* सन 2009 मध्ये प्लाटून क्रमांक 03 मधून पूर्व बस्तर डिव्हिजन मधील प्रेस, टेलर आणि सप्लाय या तिन्ही टीमचे इन्चार्ज म्हणून बदली होऊन डीव्हीसीएम पदावर सन 2014 पर्यंत काम केले.
* सन 2014 मध्ये पूर्व बस्तर डिव्हिजन मधून उत्तर बस्तर डिव्हिजन मधील प्लाटून क्र. 17 मध्ये प्लाटून कमांडर पदावर बदली होऊन सीवायपीसी पदावर सन 2016 पर्यंत काम केले.
* सन 2016 मध्ये प्लाटून क्रमांक 17 मधून उत्तर बस्तर डिव्हिजन मधील प्रेस, टेलर आणि सप्लाय या तीन टीमचे इन्चार्ज म्हणून बदली होऊन डीव्हीसीएम पदावर सन 2020 पर्यंत काम केले.
* सन 2020 मध्ये उत्तर बस्तर डिव्हिजन मास (मोबाईल अकॅडमी स्कुल) टीम मध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपर्यंत काम केले.

 कार्यकाळात केलेले गुन्हे

      भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे याच्यावर गडचिरोली जिल्ह्रात आजपर्यंत एकुण 02 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 02 खुनाच्या गुन्ह्राचा समावेश आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

2) विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक 
 दलममधील कार्यकाळ
* सन 1990 मध्ये मौजा मांड्रा रेंज कमिटी मधील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये अध्यक्षा पदावर सन 1991 पर्यंत काम केले.
* सन 1991 मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन चार महिणे काम केले.
* माहे सप्टेंबर 1991 मध्ये पेरमिली दलममध्ये बदली होऊन माहे ऑगस्ट 1994 पर्यंत काम केले.
* माहे ऑगस्ट 1994 मध्ये माड डिव्हीजन मधील डिके प्रेस टीममध्ये बदली होऊन माहे एप्रिल 1997 पर्यंत काम केले.
* माहे एप्रिल 1997 मध्ये डिके प्रेस टिममध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे जून 2003 पर्यंत काम केले.
* माहे जून 2003 मध्ये माड डिव्हीजन मधील परालकोट दलममध्ये बदली होऊन कमांडर पदावर पदोन्नती होऊन माहे सप्टेंबर 2009 पर्यंत काम केले.
* माहे सप्टेंबर 2009 मध्ये माड डिव्हीजन मधील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये अध्यक्षा पदावर पदोन्नती होऊन माहे नोव्हेंबर 2011 पर्यंत काम केले.
* माहे नोव्हेंबर 2011 मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे जुलै 2014 पर्यंत काम केले.
* माहे जुलै 2014 मध्ये माड डिव्हीजनमधील प्रेस टिममध्ये बदली होऊन डिके प्रेस टिम इंचार्ज व डिव्हीसीएम पदावर राहून आजपर्यंत काम केले.



 कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे.


3) कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी
 दलममधील कार्यकाळ

* माहे डिसेंबर 2010 मध्ये पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2011 पर्यंत काम केले
* सन 2011 मध्ये पेरमिली दलमची डीव्हीसीएम विजयक्का हिच्या गार्डमध्ये बदली होऊन सन 2012 पर्यंत काम केले
* सन 2012 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत काम केले.
* सन 2013 मध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हिजनल टेलर टीममध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत काम केले.
* सन 2018 मध्ये पश्चिम सब झोनल ब्युरो टेलर टीममध्ये बदली होऊन माहे जुलै 2019 पर्यंत काम केले.
* माहे जुलै 2019 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2022 पर्यंत काम केले. 
* सन 2022 मध्ये पश्चिम ब्युरो टेलर टीम कमांडर पदावर पदोन्नती होऊन आज पावतो काम केले.


 कार्यकाळात केलेले गुन्हे

कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी हिच्यावर गडचिरोली जिल्ह्रामध्ये आजपर्यंत एकुण 03 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 01 चकमक व 02 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.


4) नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी 
 दलममधील कार्यकाळ

* माहे जुलै 2007 मध्ये मिरतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑगस्ट 2007 पर्यंत काम केले.
* माहे ऑगस्ट 2007 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये बदली होऊन सन 2009 पर्यंत काम केले.
* सन 2009 मध्ये पश्चिम ब्युरो सप्लाय टीममध्ये बदली होऊन सन 2011 पर्यंत पार्टी मेंबर पदावर काम केले. 
* सन 2011 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे ऑगस्ट 2018 पर्यंत काम केले. 
* माहे ऑगस्ट 2018 मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन सन 2021 पर्यंत काम केले.
* सन 2021 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन पीपीसीएम पदावर आजपर्यंत काम केले.


 कार्यकाळात केलेले गुन्हे

नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी याच्यावर गडचिरोली जिल्ह्रामध्ये आजपर्यंत एकुण 09 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 04 चकमक, 01 जाळपोळ व 04 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.


5) समीर आयतू पोटाम
 दलममधील कार्यकाळ

* माहे डिसेंबर 2018 मध्ये गंगालूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जुलै 2019 पर्यंत काम केले.
* माहे जुलै 2019 मध्ये दक्षिण ब्युरो टेक्निकल टीममध्ये बदली होऊन माहे फेब्राुवारी 2025 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
* माहे फेब्राुवारी 2025 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत काम केले.

 कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे.

6) नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी 
 दलममधील कार्यकाळ

* माहे जुलै 2011 मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जुलै 2015 पर्यंत काम केले.
* माहे जुलै 2015 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन माहे जून 2018 पर्यंत काम केले.
* माहे जून 2018 मध्ये राही दलममध्ये बदली होऊन माहे जुलै 2018 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
* माहे जुलै 2018 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे जुलै 2024 पर्यंत काम केले.
* माहे जुलै 2024 मध्ये गट्टा दलम, कंपनी क्र. 10 व भामरागड या तिन्ही दलम यांचे सोबत राहून माहे डिसेंबर 2024 पर्यंत काम केले.
* माहे डिसेंबर 2024 मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन आज पर्यंत एसीएम पदावर काम केले. 


कार्यकाळात केलेले गुन्हे

नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी हिच्यावर गडचिरोली जिल्ह्रामध्ये आजपर्यंत एकुण 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 08 चकमक व 03 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस


* महाराष्ट्र शासनाने भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते
* महाराष्ट्र शासनाने कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जीहिच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी याच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने समीर आयतू पोटाम याच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.



आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक हिला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन समीर आयतू पोटाम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
(भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे व त्याची पत्नी विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक) तसेच (नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी व त्याची पत्नी कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी)
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 04 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकूण 73 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 मध्ये आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 06 माओवाद्यांसहित) एकूण 40 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Post a Comment

0 Comments