गडचिरोली, जिल्ह्यातील रेगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा गरंजी टोला जंगल परिसरात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणा-या 92 जणांवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 44,26,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन रेगडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात अवैध कोंबडा बाजार भरवून जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोलीस स्टेशन आणि उपपोलीस स्टेशनांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, 21 सप्टेंबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाने मौजा गरंजी टोला येथे कारवाई केली.
माओवादी विरोधी अभियान राबवत असताना विशेष अभियान पथकाला जंगल परिसरातून मोठमोठ्याने आरडाओरडचा आवाज आला. तपासणीदरम्यान, काही व्यक्ती कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याचे आढळले. वरिष्ठ अधिका-यांच्या परवानगीने विशेष अभियान पथक आणि रेगडी पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे धाड टाकली. धाडीची चाहूल लागताच जुगार खेळणारे जंगलात पळाले, परंतु पोलिसांनी 92 जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी 46 दुचाकी (किंमत: 16,10,000 रुपये), 5 चारचाकी वाहने (किंमत: 26,00,000 रुपये), 31 मोबाइल फोन (किंमत: 1,70,000 रुपये), 14 कोंबडे (किंमत: 3,200 रुपये), 5 लोखंडी कात्या (किंमत: 250 रुपये) आणि 42,950 रुपये रोख रक्कम असा एकूण 44,26,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन रेगडी येथे 92 आरोपींविरुद्ध कलम 12 (ब) महाराष्ट्र जुगार अधिनियम आणि कलम 11 (फ) (न) प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम, 1960 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, विशेष अभियान पथकाचे सपोनि विश्वास बागल, पोउपनि ज्ञानेश्वर धुमाळ, पोउपनि देवाजी कोवासे आणि इतर कर्मचा-यांनी यशस्वीपणे पार पाडली.
0 Comments