सिरोंचा : सिरोंचा तहसील कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेले सय्यद हमीद सत्तार हे 32 वर्षे 2 महिन्यांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर 30 जून 2025 रोजी निवृत्त झाले. कर्तव्यदक्ष आणि नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण करणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. निवृत्तीनंतरही त्यांनी जनसेवेचा वसा कायम ठेवत सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शासकीय कामकाजातील अडथळे दूर करण्यासाठी स्वत:चे विशेष कार्यालय सुरू केले आहे.
‘हमीद भैय्या’ म्हणून सर्वसामान्यांमध्ये परिचित असलेले सय्यद हमीद यांनी 3 मे 1993 रोजी भामरागड तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. 1996 पर्यंत भामरागड येथे सेवा दिल्यानंतर त्यांची गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली. त्यानंतर जून 2000 मध्ये ते सिरोंचा तहसील कार्यालयात रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली.
निवृत्तीनंतरही जनसेवेची आवड कायम ठेवून त्यांनी स्वत:चे कार्यालय उघडून लोकांच्या अडचणी सोडवण्याचा संकल्प घेतला आहे. या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सय्यद हमीद यांच्या या कार्याने निवृत्तीनंतरही समाजसेवेचा आदर्श निर्माण झाला आहे.
0 Comments