गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महिंद्रा अँण्ड महिंद्रा यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य कराराअंतर्गत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), गडचिरोली, येथे ३९० तासांचा "ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक" अभ्यासक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविला जाणार आहे. जिल्ह्यातील युवकांसाठी ही रोजगार व कौशल्य विकासाची एक मोठी संधी असून जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करून आपल्या करिअरला नवी दिशा देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी पात्रता
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांचा वयोगट १८ ते २८ वर्षांदरम्यान असावा. शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असून १२ वी किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी उपलब्ध आहे. उमेदवाराचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक असून, गंभीर आजार नसावा. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ काम करण्यास तयार असणे अपेक्षित आहे.
युवकांना रोजगार संधी
हा प्रकल्प ग्रामीण युवकांना रोजगार देणारा ठरणार असून, प्रशिक्षणानंतर महिंद्रा अँण्ड महिंद्रा व अन्य औद्योगिक क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी निवासाची सुविधाही करण्यात आली आहे.
संपर्क
अधिक माहितीसाठी शासकीय आयटीआय येथील निदेशक श्रीधर बावनकर, (मो. ७०५७०७०७८७) व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रियंका इडपात्रे,(मो. ७८४३०४८२४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी कळविले आहे.
0 Comments