आरमोरी : देऊळगाव, इंजेवारी, किटाळी, डोंगरसावंगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डाव्या पक्षांची वनविभागाला दिला आहे. देऊळगाव येथील मुक्ताबाई नेवारे (७०) व अनुसया जिंदर वाघ (७०) या सरपणासाठी गेलेल्या महिलांना गावाजवळ हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटना घडली.
सदरची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भाई अक्षय कोसनकर यांनी देऊळगाव येथे मयतांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वना दिली.
यावेळी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात ८-१० वाघ आणि बिबट्यांचा मुक्त संचार असून शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण आणि भितीदायक झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा देऊळगाव येथे वनविभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष या डाव्या पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे.



0 Comments