चामोर्शीतील 'लाडक्या बहिणीं'चा गडचिरोलीत एल्गार

न्याय न मिळाल्यास २३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा
गडचिरोली : चामोर्शी येथील गरीब महिला, शेतकरी व शेतमजुरांची अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत पीडित महिलांनी व पुरुषांनी न्यायासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. न्याय न मिळाल्यास दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, तसेच टोकाचा निर्णय घेत आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, सन २०२० मध्ये चामोर्शी येथील नगरसेवक आशिष अरुण पिपरे व त्यांची पत्नी नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अगरबत्ती प्रकल्प उभारून रोजगार देण्याचे आमिष दाखवले. यासाठी सुमारे ४० महिलांना बैठकीस बोलावून बँकेकडून कर्ज मिळवून देतो व कर्ज माफ करून देतो, अशी खोटी आश्वासने देण्यात आली. महिलांच्या खात्यात केवळ १० हजार रुपये अग्रीम रक्कम जमा करण्यात आली. मात्र बँकेशी संगनमत करून प्रत्येकी १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रत्येक लाभार्थीच्या खात्यातील सुमारे २ लाख रुपये विविध मार्गांनी वळते करून आरोपीने स्वतःकडे घेतल्याचे महिलांचे म्हणणे आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील हरीकृष्ण इंजिनिअरिंग कंपनी कडून प्रति मशीन एक लाख रुपये किमतीचे कोटेशन दाखवून प्रत्यक्षात अत्यंत हलक्या प्रतीच्या सुमारे २५,५०० रुपये किमतीच्या अगरबत्ती मशीन खरेदी करण्यात आल्या. या सर्व मशीन स्वतःच्या ताब्यात ठेवून खासगी जागेवर प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र अवघ्या सहा महिन्यांतच प्रकल्प बंद पडला. प्रकल्प बंद झाल्यानंतर महिलांना बँकांकडून कर्जफेडीच्या नोटिसा मिळू लागल्या. रोजगार किंवा मशीन देण्याची मागणी केली असता, “तुम्ही कंपनीचे सदस्य आहात, कर्ज तुम्हालाच भरावे लागेल,” असे सांगून महिलांना हाकलून लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्ज माफ करून देतो, राजकीय नेत्यांशी चर्चा सुरू आहे, असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर बँकांनी न्यायालयात दावा दाखल केल्याने महिलांना २.५ ते ३ लाख रुपयांच्या नोटिसा मिळाल्या. एप्रिल २०२५ मध्ये नागपूर येथे आयोजित मुख्यमंत्री जनता दरबारात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या वेळी चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे. याच प्रकरणात पीडित महिला सौ. वंदना सविंद्र कोठारे यांची ट्रॅक्टर व्यवहारात सुमारे ७.५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचाही आरोप असून, याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक महिलांच्या घरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कर्जफेडीच्या भीतीने आत्महत्येची वेळ आल्याचे महिलांनी सांगितले. विविध लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. पीडित महिलांनी आशिष पिपरे व सोनाली पिपरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, तसेच कोणतेही वैध उत्पन्नाचे साधन नसताना जमा केलेल्या कथित अमाप संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला कविता दिलीप किरमे, मीनाक्षी देवराव पिपरे, देवांगना महेश गौतम, निवृत्ता प्रकाश गव्हारे, शीला पुरुषोत्तम धोडरे, कविता रवी कारडे, सुषमा सतीश धोडरे, रेखा सुनील गव्हारे, छाया उमाजी बोदलकर, मेनू विनोद धोडरे, अनिता गुणवंत पिपरे, मनीषा योगेश्वर गव्हारे, सुषमा राजेश बुरांडे, अर्चना किशोर बुरांडे, शारदा बबन पिपरे, साधना बाळा धोडरे, जयश्री रमेश पिपरे, वंदना सविंद्र कोठारे, अर्चना सुनील धोडरे, चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के, ओमदास कवडू झरकर, नितेश दत्तू पिपरे, मिलिंद नामदेव भांडेकर, आश्विनी धराराज गंधारे आदींची उपस्थिती होती. बॉक्स.... दरम्यान, या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रीया घेण्यासाठी आशिष पिपरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवित होता.

Post a Comment

0 Comments