गडचिरोली :- कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा स्थानिक तक्रार निवारण समिती” गठीत केलेली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सौ. ग्रीष्मा विवेक मून (रा. नवेगाव, जि. गडचिरोली) यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केली आहे.
सौ. ग्रीष्मा मून गेल्या सुमारे १५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना सौ. ग्रीष्मा मून यांनी सांगितले की, “समाजातील शोषित व पीडित महिला वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली आहे. महिला सशक्तीकरणासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. ही नियुक्ती म्हणजे मला ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मिळालेला सन्मान आहे.”
सौ. ग्रीष्मा मून यांच्या नियुक्तीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यात आमदार डॉ. मिलिंद नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, नगरसेवक लीलाधर भरडकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश कात्रटवार, लीलाधर सूत्रपवार (साई सेवा समिती), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ. बाळू सहारे, डॉ. उज्वला साहरे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. खुशबू दुर्गे, डॉ. मुकुंद ढबाले, डॉ. अंजली साखरे (रक्तपेढी), डॉ. खुशाल दुर्गे, डॉ. नगराळे, समाजसेविका कुसुम आलाम, नगरसेविका योगिता पीपरे, नागसेन खोब्रागडे, मुख्याध्यापक विवेकानंद हुलके, अतुल आलामपटलावर, विलास पारखी, उपेंद्र रोहनकर, तसेच देवानंदन कामडी (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) आदी राजकीय, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 Comments